
पुणे दि.15 : मतदानानंतर बोटावर लावलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून पुन्हा मतदान करण्याचा प्रयत्न करणे हे गंभीर गैरकृत्य असून, अशा व्यक्तीस पुन्हा मतदान करता येणार नाही, तसेच त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने दिले आहे.राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की, एखाद्या मतदाराने मतदान केल्यानंतर त्याची अधिकृत नोंद प्रणालीत घेतली जाते. त्यामुळे केवळ बोटावरील शाई पुसल्याने पुन्हा मतदान करणे शक्य नाही. अशा प्रकारे संभ्रम निर्माण करण्याचा किंवा गैरकृत्य करण्याचा प्रयत्न आढळल्यास संबंधित मतदारावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.मतदाराच्या बोटाला शाई लावण्यासाठी मार्कर पेनच्या वापराबाबत राज्य निवडणूक आयोगाने 19 नोव्हेंबर 2011 आणि 28 नोव्हेंबर 2011 रोजी आदेश जारी केले आहेत. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदाराच्या बोटावर ठळकपणे उमटेल, अशा पद्धतीने मार्कर पेनने शाई लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नखावर तसेच नखाच्या वरच्या बाजूच्या त्वचेवर तीन ते चार वेळा शाई घासून लावण्याबाबत स्पष्ट मार्गदर्शन करण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर, बोटावरील शाई पुसण्याचा प्रयत्न करून कोणतेही गैरकृत्य करू नये, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने मतदारांना केले असून, सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचनाही पुन्हा देण्यात आल्या आहेत