
पुणे दि.१५ : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ साठी आज मतदान प्रक्रिया सुरू आहे. सकाळी ७.३० वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली असून सकाळी ११.३० वाजेपर्यंत शहरात सरासरी १४.७९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, पुणे महापालिकेतील एकूण ४१ प्रभागांमध्ये ५५ लाख ५२ हजार ६३७ मतदार असून त्यापैकी सकाळी ११.३० वाजेपर्यंत ५ लाख २९ हजार ९३३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ३ लाख ६ हजार ८३९, तर महिला मतदारांची संख्या २ लाख २३ हजार ८४ इतकी आहे. काही प्रभागांमध्ये मतदानाचा उत्साह तुलनेने अधिक दिसून आला असून तर काही भागात मतदानाची टक्केवारी कमी असल्याचे चित्र आहे.
दुपारनंतर मतदानाचा वेग वाढण्याची शक्यता निवडणूक प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, मतदारांनी निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.