पिंपरी-चिंचवड निवडणूक काळात मोठी कारवाई; रहाटणीतील गणराज कॉलनीतून १९ वॉशिंग मशिन्स जप्त

पुणे दि. 15 : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेच्या अंमलबजावणीदरम्यान रहाटणी परिसरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. ड प्रभाग क्षेत्रातील गणराज कॉलनी येथे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या भरारी पथकाने (Flying Squad) ही धडक कारवाई केली.

निवडणूक काळात मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी घरगुती वस्तूंचे वाटप केले जात असल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर संबंधित ठिकाणी झडती घेण्यात आली. या कारवाईदरम्यान घटनास्थळावरून तब्बल १९ वॉशिंग मशिन्स जप्त करण्यात आल्या आहेत.

निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित व्यक्तींविरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासनाकडून कडक उपाययोजना केल्या जात आहेत.

दरम्यान, निवडणुकीशी संबंधित कोणतीही आचारसंहिता भंगाची तक्रार असल्यास नागरिकांनी सी-व्हिजिल (cVIGIL) ॲपद्वारे तक्रार नोंदवावी किंवा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button