
पुणे दि. 15 : परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) महत्त्वाच्या सूचना जाहीर केल्या आहेत. आगामी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार असून, या प्रक्रियेसंदर्भात मंडळाने स्पष्ट मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी स्वतः हॉल तिकीट डाऊनलोड करू नये, तर संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांनीच हॉल तिकीट डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांना देणे बंधनकारक असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.
प्रिंट काढलेल्या हॉल तिकीटावर महाविद्यालयाच्या प्राचार्यांची स्वाक्षरी व अधिकृत शिक्का असणे आवश्यक आहे. याशिवाय, हॉल तिकीट देताना विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारू नये, अशा स्पष्ट सूचना मंडळाकडून देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, हॉल तिकीट डाऊनलोड करताना किंवा प्राप्त करताना विद्यार्थ्यांना कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास त्यांनी त्वरित आपल्या महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी, असेही मंडळाने नमूद केले आहे.