पुण्यातील धायरी प्रभाग ३४ मध्ये मतदानावेळी शाई पुसली जात असल्याचा प्रकार उघड; बोगस मतदानाचा संशय, तणावाचे वातावरण

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान धायरी परिसरातील प्रभाग क्रमांक ३४ मध्ये एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी नारायणराव सणस विद्यालयातील मतदान केंद्रावर मतदारांच्या बोटावर लावली जाणारी शाई सहजपणे पुसली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे बोगस मतदानाचा संशय व्यक्त करण्यात येत असून मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मतदानासाठी आलेल्या काही मतदारांनी बोटावर लावलेली शाई थिनर किंवा सॅनिटायझरसारख्या द्रव्याने लगेच निघत असल्याच्या तक्रारी केल्या. काही ठिकाणी अधिकृत अमिट शाईऐवजी मार्कर पेनचा वापर केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे मतदारांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार गट) कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर वापरण्यात येणाऱ्या शाईऐवजी वेगळ्या प्रकारच्या केमिकलचा वापर होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. सकाळी सुमारे १०:३० वाजता मतदान केंद्राबाहेर एका व्यक्तीला बोटावरील शाई पुसताना पकडण्यात आले. संतप्त कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला मारहाण केली, ज्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

या घटनेनंतर संबंधित व्यक्तीकडील संशयास्पद लिक्विड जप्त करण्यात आले असून, प्रकरणाबाबत पोलीस प्रशासन आणि निवडणूक आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, पुण्यासह मुंबईतही काही मतदान केंद्रांवर मार्कर पेनच्या वापरामुळे बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. अशा कोणत्याही गैरप्रकाराबाबत नागरिकांनी राष्ट्रीय तक्रार सेवा पोर्टल (NGSP) किंवा निवडणूक आयोगाच्या १८००-२२-१९५० या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button