पुणे दि. 14 : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जानेवारी २०२६ मध्ये सलग चार दिवस ‘ड्राय डे’ (कोरडा दिवस) जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाच्या टप्प्यांदरम्यान मद्यविक्रीवर पूर्णतः बंदी घालण्यात येणार आहे.निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने १३ जानेवारी २०२६ (मंगळवार) रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून मद्यविक्री बंद करण्यात आली आहे. त्यानंतर १४ जानेवारी २०२६ (बुधवार) रोजी मकर संक्रांतीचा सण तसेच मतदानाचा आदल्या दिवस असल्यामुळे संपूर्ण दिवस मद्यविक्रीवर बंदी राहणार आहे.महानगरपालिका निवडणुकीचा मुख्य मतदानाचा दिवस असलेल्या १५ जानेवारी २०२६ (गुरुवार) रोजी राज्यभर पूर्णतः ड्राय डे लागू राहील. तसेच १६ जानेवारी २०२६ (शुक्रवार) रोजी मतमोजणीच्या दिवशी निकाल जाहीर होईपर्यंत मद्यविक्रीस बंदी असेल.ही बंदी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर यांसह निवडणूक होणाऱ्या सर्व २९ महानगरपालिका क्षेत्रांत लागू राहणार आहे. या कालावधीत वाईन शॉप्स, बिअर बार, परमिट रूम्स आणि हॉटेल्स येथे कोणत्याही प्रकारची मद्यविक्री करता येणार नाही.नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कडक कारवाई करण्यात येईल तसेच परवाना रद्द करण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.दरम्यान, २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभर ड्राय डे जाहीर करण्यात आल्याची माहितीही प्रशासनाने दिली आहे.