
पुणे, दि. 14 : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ अंतर्गत मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी १५ जानेवारी २०२६ रोजी कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी द्यावी. पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नसल्यास किमान दोन ते तीन तासांची सवलत देण्यात यावी, असे आवाहन कामगार उपआयुक्त निखील वाळके यांनी केले आहे.
उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या ३० डिसेंबर २०२५ रोजीच्या परिपत्रकानुसार कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, खाजगी कंपन्या, निवासी हॉटेल्स, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार व औद्योगिक उपक्रम, तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स व रिटेलर्स यामधील अधिकारी, कर्मचारी व कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक आहे.
सर्व आस्थापना मालक व व्यवस्थापनाने या परिपत्रकातील निर्देशांचे तंतोतंत पालन करावे. कोणत्याही आस्थापनेत मतदानासाठी भरपगारी सुट्टी किंवा सवलत न दिल्याची तक्रार प्राप्त झाल्यास, संबंधित आस्थापनेविरोधात निवडणूक आयोग व शासनाच्या निर्देशानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही कामगार उपआयुक्तांनी दिला आहे.
मतदानासाठी सुट्टी किंवा सवलत न दिल्यास कर्मचारी व कामगारांनी अपर कामगार आयुक्त कार्यालय, पुणे विभाग तसेच कामगार उपआयुक्त कार्यालयाच्या alcpune5@gmail.com
व dycl2021@gmail.com
या ई-मेलवर आस्थापनेचे नाव, जबाबदार अधिकाऱ्याचे नाव व संपर्क क्रमांकासह तक्रार दाखल करावी.
यासंदर्भात अधिक माहितीसाठी सहाय्यक कामगार आयुक्त प्रविण जाधव (९५२९६११८०७), ग. स. शिंदे (९७३०१२११५२), द. दा. पवार (९८२२७३३३७०), सु. तु. शिर्के (७७७५९६६६०६), कै. ल. मुजमुले (९८२३९९७७२२) तसेच अधीक्षक व. पं. सोनंदकर (९९६०५५७११६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.