
पुणे दि.15 : राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी आज, गुरुवार दि. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७:३० वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली असून, विविध मतदान केंद्रांवर मतदार आपला लोकशाही हक्क बजावताना दिसत आहेत.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदानाची वेळ सकाळी ७:३० ते संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सर्व मतदान केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे.
या महानगरपालिका निवडणुकांचा निकाल १८ जानेवारी २०२६ रोजी जाहीर होण्याची शक्यता असून, राज्याच्या राजकारणात या निकालांकडे मोठ्या उत्सुकतेने पाहिले जात आहे.
दरम्यान, मतदारांनी मतदानासाठी जाताना मतदार ओळखपत्र, आधार कार्ड किंवा निवडणूक आयोगाने मान्य केलेले अन्य ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य आहे. आपल्या प्रभागातील उमेदवारांची माहिती तसेच मतदान केंद्राचे स्थान जाणून घेण्यासाठी मतदारांनी निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.