बजाज पुणे ग्रँड टूरमुळे शेती, पर्यटन व ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी गती – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि. १३ : पुणे शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात येत्या १९ जानेवारीपासून होणारी बजाज पुणे ग्रँड टूर ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा केवळ क्रीडा क्षेत्रापुरती मर्यादित न राहता शेती, पर्यटन, लघुउद्योग आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी मैलाचा दगड ठरणार आहे, असा विश्वास पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी व्यक्त केला.

पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, स्पर्धेसाठी निर्माण करण्यात आलेल्या उच्च दर्जाच्या रस्त्यांमुळे जिल्ह्यातील दळणवळण व्यवस्था अधिक गतिमान झाली असून त्याचा थेट फायदा शेतकरी, व्यापारी आणि पर्यटकांना होणार आहे. शर्यतीच्या मार्गावर येणाऱ्या गावांमधील नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्याचेही त्यांनी नमूद केले.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या भावना मांडताना डुडी म्हणाले की, सुधारित रस्त्यांमुळे शेतमाल कमी वेळेत शहरातील बाजारपेठेत पोहोचवणे शक्य झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळत असून ताजा शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचत आहे.

सासवड परिसरातील प्रगतिशील शेतकरी महेश पोमण यांनी सेंद्रिय पद्धतीने ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरीसारखी दुर्मिळ विदेशी फळे पिकवण्यास सुरुवात केली असून सुधारित रस्त्यांमुळे हा माल वेळेत बाजारात पोहोचवणे शक्य झाल्याचे सांगितले. अंजीर उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या सासवड भागातील शेतकऱ्यांनीही रस्ते विकासामुळे मोठा दिलासा मिळाल्याचे स्पष्ट केले.

या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमुळे पुणे जिल्ह्यातील पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे. मावळ परिसरातील निसर्गसंपन्न भाग, ऐतिहासिक किल्ले, धरणे, अॅग्री टुरिझम रिसॉर्ट्स आणि साहसी पर्यटन स्थळे जागतिक पातळीवर पोहोचण्यास मदत होणार असल्याचा विश्वास पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

या स्पर्धेत ३५ देशांतील १७१ आंतरराष्ट्रीय सायकलपटू २९ संघांच्या माध्यमातून सहभागी होत असून, ही शर्यत दूरचित्रवाणी व डिजिटल माध्यमातून जगभर प्रसारित होणार आहे. त्यामुळे भविष्यात परदेशी पर्यटक पुणे आणि मावळ परिसराकडे आकर्षित होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

स्पर्धेच्या तयारीत सहभागी असलेले कामगार, व्यावसायिक आणि ग्रामस्थ या उपक्रमाकडे ‘देशसेवा’ म्हणून पाहत असून, सायकल संस्कृती पुन्हा एकदा बळकट होईल, अशी भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. बजाज पुणे ग्रँड टूर ही स्पर्धा पुणे जिल्ह्यासाठी केवळ क्रीडा नव्हे, तर विकासाची नवी ओळख ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button