
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत वॉर्ड क्रमांक ९ (बाणेर–सूस–पाषाण) मध्ये मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबुराव चंदेरे यांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात गुन्हेगारी प्रकरणांची माहिती लपवल्याचा आरोप करत, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गणेश कळमकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे.
गणेश कळमकर यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार, बाबुराव चंदेरे यांनी गंभीर स्वरूपाच्या प्रलंबित गुन्हेगारी प्रकरणांची माहिती जाणीवपूर्वक लपवून निवडणूक प्रशासन तसेच मतदारांची दिशाभूल केली आहे. यामुळे त्यांचे नामांकन रद्द करण्यात यावे, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, बाबुराव चंदेरे यांच्यावर दोन गंभीर गुन्हे प्रलंबित असून या प्रकरणांमध्ये दोषारोपपत्र दाखल झालेले आहे. संबंधित गुन्ह्यांमध्ये २ ते १० वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते, असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
या संदर्भात गणेश कळमकर यांनी सांगितले की, “शपथेवर खोटी माहिती देणे किंवा तथ्य लपवणे हा केवळ तांत्रिक दोष नसून तो गंभीर गुन्हा आहे. भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २२९ नुसार खोटे पुरावे देणे हा दंडनीय अपराध आहे. यामुळे मतदारांच्या माहितीच्या अधिकारावर गदा येते.”
ही याचिका कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी नसून निवडणूक प्रक्रियेची शुचिता, पारदर्शकता आणि प्रामाणिकता अबाधित ठेवण्यासाठी दाखल करण्यात आल्याचेही कळमकर यांनी स्पष्ट केले. खोट्या माहितीच्या आधारे कोणालाही लोकशाहीच्या पवित्र प्रक्रियेत सहभागी होऊ देणे चुकीचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रकरणामुळे बाणेर–सूस–पाषाण वॉर्डातील निवडणूक लढत आणखी रंगतदार झाली असून, उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.