लहुजी शक्ती सेनेचा आबा बागुलांसह शिवसेनेच्या संपूर्ण पॅनेलला जाहीर पाठिंबा

पुणे, दि. 13 : लहुजी शक्ती सेनेचे नेते विष्णूभाऊ कसबे यांनी शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार आबा बागुल यांच्यासह संपूर्ण शिवसेना पॅनेलला जाहीर पाठिंबा दर्शवत, त्यांना विक्रमी मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले आहे.

प्रभाग क्रमांक ३६ (ड) सहकारनगर – पद्मावती येथील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आबा बागुल यांच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाला विष्णूभाऊ कसबे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी आबा बागुल यांच्याकडून प्रचाराचा सविस्तर आढावा घेतला.

शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्य विकासाभिमुख असून, आबा बागुल यांचे आजवरचे कार्य हे लोकाभिमुख व समाजहिताचे असल्याने लहुजी शक्ती सेना आबा बागुल यांच्यासह संपूर्ण शिवसेना पॅनेलला जाहीर पाठिंबा देत असल्याचे विष्णूभाऊ कसबे यांनी सांगितले. संपूर्ण समाजाची ताकद आबा बागुल यांच्या पाठीशी उभी असल्याचेही त्यांनी नमूद करत, समाजबांधवांना विक्रमी मतांनी शिवसेना पॅनेलला विजयी करण्याचे आवाहन केले.

या जाहीर पाठिंब्यामुळे शिवसेनेची ताकद निश्चितपणे वाढल्याची प्रतिक्रिया उमेदवार आबा बागुल यांनी यावेळी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button