पुणे :अखिल भारतीय काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने प्रभाग क्रमांक २२ मधील अधिकृत उमेदवार इंदिरा अविनाश बागवे, अविनाश रमेश बागवे, रफिक शेख आणि दिलशाद जुबेर बाबू यांच्या प्रचारासाठी माजी मंत्री रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली भव्य व विराट रॅली काढण्यात आली.ही रॅली काशेवाडी, लोहियानगर आणि डायस प्लॉट परिसरातून काढण्यात आली. मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला आणि स्थानिक नागरिक रॅलीत सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि पक्षाच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.यावेळी रमेश बागवे यांनी नागरिकांशी संवाद साधत, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस–शिवसेना (उबाठा) आघाडीला संधी देण्याचे आवाहन केले. “लोकहिताचा कारभार, पारदर्शकता आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर ठामपणे आवाज उठवणारे नेतृत्व देण्याचा आमचा संकल्प आहे,” असे त्यांनी सांगितले.रॅलीदरम्यान स्थानिक प्रश्न, पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि रोजगार यांसारख्या मुद्द्यांवर नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या विराट रॅलीमुळे प्रभाग २२ मध्ये काँग्रेस–शिवसेना (उबाठा) आघाडीचा उत्साह आणि संघटनबळ अधिक बळकट झाल्याचे चित्र दिसून आले.