
पुणे : पुणे शहराचे उत्तर प्रवेशद्वार असलेले औंध हे ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेले उपनगर असून, आता ‘स्मार्ट’ शहराच्या पुढील टप्प्यात शाश्वत, पर्यावरणपूरक आणि उच्च तंत्रज्ञानावर आधारित विकासाकडे नेण्याचा निर्धार प्रभाग क्रमांक ८ (औंध–बोपोडी) मधील भारतीय जनता पक्ष–रिपब्लिकन पक्ष युतीचे उमेदवार चंद्रशेखर उर्फ सनी विनायक निम्हण यांनी व्यक्त केला आहे.
औंध–बोपोडी प्रभागात आयोजित पदयात्रेच्या समारोपप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, औंध येथे ते बोलत होते. यावेळी सहकारी उमेदवार परशुराम वाडेकर, भक्ती गायकवाड, सपना छाजेड, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, माजी नगरसेविका संगीता गायकवाड, स्वीकृत नगरसेवक वसंतराव जुनवणे, औंध विश्वस्त मंडळाचे सदस्य तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
निम्हण म्हणाले, “औंध–बोपोडी परिसराला स्मार्ट शहराच्या सुविधांचा लाभ मिळाला असला, तरी आता पुढील टप्प्यात हा भाग गुणवत्तापूर्ण सेवा, पर्यावरणसंवर्धन आणि तंत्रज्ञानाधारित प्रशासन यांचे आदर्श मॉडेल म्हणून विकसित करणे गरजेचे आहे.”
ते पुढे म्हणाले, “फक्त प्रशासकीय यंत्रणा पुरेशी नसते; नागरिकांचा सक्रिय सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. औंध–बोपोडीतील नागरिकांनी प्रशासन आणि लोकसहभागाचा आदर्श निर्माण करावा,” असे आवाहन त्यांनी केले.
आगामी काळात उच्च तंत्रज्ञानावर आधारित नागरी सुविधा, स्वच्छता, शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था, स्थानिक नागरिकांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग आणि शाश्वत विकासावर भर दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यासोबतच मुळा नदीच्या पात्राचा आणि घाट परिसराचा पर्यावरणपूरक विकास करण्याची गरज अधोरेखित करताना, नैसर्गिक सौंदर्य जपून दीर्घकालीन पर्यावरणीय संतुलन राखण्यावर भर दिला जाईल, असे निम्हण यांनी सांगितले.
या विकास दृष्टिकोनामुळे औंध–बोपोडी परिसरातील नागरिकांचे जीवनमान उंचावेल, पर्यावरण सुधारेल आणि सर्वसमावेशक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.