
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक २४ (कसबा गणपती – कमला नेहरू हॉस्पिटल – केईएम हॉस्पिटल) येथील उमेदवार व पक्षाचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांनी पारंपरिक प्रचार पद्धतींना छेद देत अनोखा आणि शिस्तबद्ध जनसंपर्क अभियान राबवले आहे. गेल्या सहा महिन्यांहून अधिक कालावधीत त्यांनी घरोघरी भेटी देत तब्बल २० लाखांहून अधिक पावले चालत प्रभागातील सुमारे ६० हजार मतदारांशी किमान तीनदा थेट संवाद साधला आहे.
बिडकर यांच्या स्मार्टफोनवरील फिटनेस अॅपनुसार, त्यांनी या काळात दररोज सरासरी १०,५११ पावले चालली. जुलै २०२५ पासून सुरू झालेल्या या संपर्क मोहिमेत प्रभाग मध्यवर्ती व वर्दळीचा असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पारंपरिक पदयात्रा टाळण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्याऐवजी नियोजनबद्ध पद्धतीने थेट घरोघरी भेटी देण्यावर भर देण्यात आला.
या जनसंपर्कादरम्यान बिडकर यांनी अनेक नागरिकांच्या घरी सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण घेत मतदारांशी आपुलकीचा संवाद साधला. डिसेंबर २०२५ मध्ये भाजपचे निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी मिळाल्यानंतरही त्यांच्या संपर्क मोहिमेत कोणताही खंड पडू दिला नाही.
याबाबत बोलताना गणेश बिडकर म्हणाले,
“नियमित व्यायाम आणि नियंत्रित आहारामुळे संपूर्ण प्रचार काळात मी तंदुरुस्त राहिलो. या २० लाख पावलांतून मला पंढरपूर वारीच्या चार वारीएवढे आशीर्वाद मिळाले, याचे समाधान आहे.”
प्रभाग २४ मध्ये विविध धर्म, जाती आणि आर्थिक स्तरातील मतदार असून, पदयात्रा न करता थेट संवाद साधणाऱ्या या ‘बिडकर पॅटर्न’चे नागरिकांकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदयात्रा व जाहीर सभांचे आयोजन केल्याने भाजपा उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
“मी चाललेली ही २० लाख पावले ही केवळ प्रचारासाठी नव्हे, तर प्रभाग २४ आणि पुण्याच्या विकासासाठी टाकलेले एक ठोस पाऊल आहे,” असेही बिडकर यांनी नमूद केले.
या अनोख्या जनसंपर्क मोहिमेमुळे प्रभाग २४ मध्ये गणेश बिडकर यांची पकड अधिक मजबूत झाली असून, १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानात त्यांच्या विजयाचा दावा अधिक बळकट झाला आहे.