“हा क्षण आयुष्यभर लक्षात राहील” – पुण्यात ‘संभावामि युगे युगे’च्या पहिल्या हाऊसफुल्ल शोवर संस्कृती बालगुडे भावूक

पुणे दि. 13: फॅशन, अभिनय आणि नृत्य यांच्या जोरावर कायम चर्चेत असलेली अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिने तिच्या स्वनिर्मित नृत्यनाट्य ‘संभावामि युगे युगे’ च्या भारतातील पहिल्या वहिल्या शोने पुणेकरांची मने जिंकून घेतली. पुण्यात पार पडलेला हा शो दणक्यात हाऊसफुल्ल ठरला असून, प्रेक्षकांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादामुळे संस्कृती भावूक झाली आहे.भगवान श्रीकृष्णाच्या विविध रूपांवर आणि त्यांच्या लीलांवर आधारित असलेल्या या भव्य डान्स ड्रामाची संकल्पना, निर्मिती, दिग्दर्शन आणि कोरिओग्राफी स्वतः संस्कृती बालगुडे हिने केली आहे. परदेशात, विशेषतः दुबईमध्ये, या नृत्यनाट्याला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर आता भारतातही हा प्रयोग रसिकांच्या पसंतीस उतरू लागला आहे.पुण्यातील पहिल्या शोविषयी बोलताना संस्कृती म्हणते,“दुबईत पहिला शो झाला तेव्हा प्रेक्षक वर्ग वेगळा होता. पण आपल्या मातीत, आपल्या पुण्यात हा शो सादर करताना मनात थोडी धाकधूक होती. मात्र पुणेकरांनी माझ्या श्रीकृष्णाच्या भूमिकेला जे प्रेम दिलं, ते शब्दात मांडणं कठीण आहे. काही प्रेक्षकांनी येऊन सुंदर प्रतिक्रिया दिल्या, तर काहीजण भावूक होऊन चक्क पाया पडत होते.”एका ज्येष्ठ प्रेक्षकांनी “या शोमुळे कृष्ण अधिक जवळचा वाटला” अशी भावना व्यक्त केली, तर एका आजींनी “हा प्रयोग जागतिक दर्जाचा आहे” अशी दाद दिली. स्वतःच्या होम ग्राउंडवर स्वतः निर्मित केलेली कलाकृती सादर करताना मिळालेलं हे प्रेम आयुष्यभर लक्षात राहील, असं संस्कृतीने सांगितलं.दुबईपासून सुरू झालेला ‘संभावामि युगे युगे’चा प्रवास आता भारतातील विविध शहरांमध्ये पोहोचणार असून, आगामी काळात संस्कृती बालगुडे विविध वैविध्यपूर्ण भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button