काँग्रेसला विचारात घेतल्याशिवाय पुण्यात सत्ता शक्य नाही – विश्वजीत कदम

पुणे, दि. 13 :पुणे महानगरपालिकेत सत्ता स्थापन करायची असेल तर काँग्रेसला विचारात घेतल्याशिवाय कोणालाही पर्याय राहणार नाही, असा ठाम विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यमंत्री व आमदार विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस व समविचारी पक्षांना चांगले यश मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या आघाडीच्या वतीने सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजित दरेकर, काँग्रेस नेते विरेंद्र किराड, अमीर शेख, यशराज पारखी, सुनील शिंदे, प्राची दुधाने आदी उपस्थित होते.विश्वजीत कदम म्हणाले की, यंदाच्या मनपा निवडणुकीमुळे नागरिकांना आपला आवाज मांडण्याची महत्त्वाची संधी मिळत आहे. मात्र, सत्ताधारी महायुतीमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू असून राजकीय नाटक पाहायला मिळत आहे. खालच्या पातळीवरील टीका करूनही सत्तेत एकत्र राहून जनतेची फसवणूक केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.पुणे शहरातील अनेक मूलभूत प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, मनपा निवडणूक उशिरा झाल्यामुळे प्रशासक राजवटीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी केला.सुरुवातीला भाजपने प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसत असले, तरी काँग्रेस आघाडीने प्रत्येक प्रभागात सक्षम उमेदवार देत प्रभावी प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस पक्ष तळागाळात रुजलेला असून जनतेचा विश्वास काँग्रेसवर असल्याचे त्यांनी नमूद केले.महायुतीतील पक्षांकडून तिजोरी आपली असल्याचे दावे केले जात असले, तरी तिजोरीतील पैसा हा जनतेचा असून जनता खरी मालक आहे, असे कदम म्हणाले. राज्याची आर्थिक स्थिती बिकट असताना मोफत योजनांच्या घोषणा करणे चुकीचे आहे. शेतकरी कर्जबाजारी असताना कर्जमाफी दिली जात नाही, तसेच ‘लाडकी बहीण’ योजनेचे दोन महिन्यांचे पैसे एकत्र देणे हा निव्वळ निवडणूकपूर्व राजकीय निर्णय असल्याची टीकाही त्यांनी केली.राज्यात महिलांची सुरक्षितता ही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी असून, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आपल्या राजकीय वाटचालीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नसतानाही पक्षाच्या आदेशाने त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली. सध्या ते सांगलीतून आमदार म्हणून कार्यरत असून भविष्यातही सांगलीतूनच निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button