महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी प्रचार आज थांबणार; १५ जानेवारीला मतदान, १६ रोजी निकाल

पुणे, दि. 13 : महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे यांसह एकूण २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रचाराचा शेवटचा दिवस आज, मंगळवार (१३ जानेवारी २०२६) आहे. सायंकाळी ५:३० वाजता जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावणार असून त्यानंतर कोणत्याही प्रकारचा प्रचार करण्यास बंदी राहणार आहे.

या निवडणुकांसाठी मतदान गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत होणार आहे. मतदानाच्या दिवशी संबंधित महानगरपालिका क्षेत्रांमध्ये राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे, त्यामुळे मतदारांना मतदानाचा हक्क बजावणे सुलभ होणार आहे.

मतदानानंतर शुक्रवार, १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जाणार आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने १३ ते १६ जानेवारी २०२६ या कालावधीत ‘ड्राय डे’ जाहीर करत दारू विक्रीवर पूर्णतः बंदी घातली आहे.

या निवडणुका मुंबई महानगरपालिका (BMC), पुणे महानगरपालिका (PMC), ठाणे (TMC), नागपूर, नाशिक यांसारख्या मोठ्या शहरांसह राज्यातील एकूण २९ महानगरपालिकांमध्ये होत आहेत. निवडणूक प्रक्रियेबाबत अधिकृत व सविस्तर माहितीसाठी उमेदवार व नागरिकांनी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button