नामवंत आंतरराष्ट्रीय सायकलपटूंचे कौशल्य प्रत्यक्ष पाहण्याची संधी गमावू नका – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि. १२ : ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेत जगभरातील नामवंत सायकलपटू सहभागी होणार असून, त्यांच्या क्रीडा कौशल्याचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याची ही सुवर्णसंधी नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी गमावू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. या स्पर्धेतून देशातील अधिकाधिक खेळाडूंना प्रेरणा मिळून ते भविष्यात ऑलिम्पिकसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी पात्र ठरतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

फर्ग्यूसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री. डुडी बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी यशवंत माने, प्राचार्य डॉ. श्याम मुडे, उपप्राचार्य डॉ. राधिका जाधव, डॉ. प्रकाश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.‘बजाज पुणे ग्रँड टूर’ संदर्भात माहिती देताना जिल्हाधिकारी डुडी म्हणाले की, या स्पर्धेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गड-किल्ले, धरणे, नद्या, गवताळ प्रदेश, डोंगररांगा, जैवविविधता, वनसंपदा, प्राणीजीवन, तसेच सांस्कृतिक, ऐतिहासिक व धार्मिक स्थळे जागतिक पातळीवर पोहोचवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. नागरिकांमध्ये आरोग्यदायी जीवनशैली विकसित करणे, प्रदूषण कमी करण्यासाठी सायकल वापराला चालना देणे आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

ही स्पर्धा चार टप्प्यांत होणार असून, प्रशासनाकडून जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आहे. स्पर्धा मार्गाच्या दोन्ही बाजूंनी उभे राहून महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास, संगीत, वेशभूषा, नाट्य व लोकनाट्यांच्या माध्यमातून खेळाडूंचे स्वागत करावे व त्यांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले. मात्र, स्पर्धेला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांनी किमान एक तरी खेळ खेळावा; खेळामुळे आरोग्य सुदृढ राहते, वैचारिक जडणघडण होते आणि संघभावना विकसित होते, असे सांगत श्री. डुडी यांनी अधिकाधिक विद्यार्थी, खेळाडू व नागरिकांनी कुटुंबीयांसह ही स्पर्धा पाहावी, असे आवाहन केले.कार्यक्रमानंतर ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ विषयी माहिती देणारी चित्रफीत उपस्थितांना दाखविण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button