
पुणे, दि. 12 :नागरिकांना पायाभूत सुविधांसोबतच दर्जेदार व परवडणाऱ्या आरोग्यसेवेची गरज लक्षात घेऊन आपल्या व्हिजनमध्ये ३०० खाटांचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याची ठोस तरतूद केल्याने हे रुग्णालय नागरिकांसाठी निश्चितच आधारवड ठरणार असल्याचा विश्वास शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार आबा बागुल यांनी व्यक्त केला.प्रभाग क्रमांक ३६ (ड) सहकारनगर–पद्मावती येथील शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार आबा बागुल यांच्या प्रचाराला सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विशेषतः महिला वर्गाचा सहभाग व उत्साह लक्षणीय ठरत आहे. पदयात्रा, कोपरा सभा व नागरिकांशी थेट संवादातून आबा बागुल यांनी मांडलेल्या व्हिजनमधील पंचसूत्री कार्यक्रमाला नागरिकांची व्यापक पसंती मिळत आहे.पंचवार्षिक कालावधीत प्रत्यक्षात राबविण्यात येणाऱ्या पाच महत्त्वाच्या कामांचा समावेश असलेली ही पंचसूत्री यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरत आहे. याबाबत बोलताना आबा बागुल म्हणाले की, “जाहीरनामा प्रत्येकजण मांडतो, मात्र तो प्रत्यक्षात पूर्णत्वास नेणे महत्त्वाचे असते. आजवर मी मांडलेली कामे पूर्ण केली आहेत, त्यामुळे यंदाही नागरिकांच्या आरोग्यसेवेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.”आज खासगी रुग्णालयांतील महागड्या आरोग्यसेवा सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या नाहीत. ही बाब लक्षात घेऊन ३०० खाटांची क्षमता असलेले, सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे.या रुग्णालयात आपत्कालीन सेवा, तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा, अत्याधुनिक निदान व उपचार सुविधा उपलब्ध असणार असून सामान्य नागरिकांना परवडणारी, दर्जेदार आरोग्यसेवा देण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच गरीब व मध्यमवर्गीयांसाठी विशेष सवलती व विविध आरोग्य योजना राबविण्यात येणार आहेत. एकूणच निरामय आरोग्यासाठी ही एक भक्कम पायाभरणी ठरणार असल्याचा विश्वास आबा बागुल यांनी व्यक्त केला.