भाजप सत्तेत असूनही विकास नाही; काँग्रेसच सर्वसामान्यांचा खरा आवाज – रमेश बागवे

पुणे : भाजप केंद्र व राज्यात सत्तेत असतानाही सर्वसामान्यांची फसवणूक, वाढती गुन्हेगारी आणि जातीयवादामुळे पुण्यासारखे विद्येचे माहेरघरही आज असुरक्षित झाले आहे. ही परिस्थिती बदलायची असेल तर काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करणे आवश्यक आहे, असे आवाहन माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी केले.लोहियानगर येथे आयोजित प्रचार सभेत बोलताना त्यांनी अखिल भारतीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व मित्रपक्षांच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भाजपवर जोरदार टीका केली. इंदिरा अविनाश बागवे, अविनाश बागवे, रफिक शेख आणि दिलशाद शेख हे उमेदवार उच्चशिक्षित, सेवाभावी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले असल्याचे त्यांनी सांगितले.भाजपकडून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि सावकारी व्यवसायाशी संबंधित उमेदवारांना पुढे केले जात असल्याचा आरोप करत बागवे यांनी जातीयवादाच्या आधारे जनतेची दिशाभूल केली जात असल्याचे नमूद केले. महापालिकेची तिजोरी रिकामी करून विकासाचे खोटे दावे केले जात असून, केंद्र व राज्यात सत्ता असूनही नागरिकांच्या जीवनात कोणताही ठोस बदल झालेला नाही, अशी टीकाही त्यांनी केली.तरुणांना रोजगार देण्याऐवजी धर्माच्या नावाखाली भडकवण्याचे काम भाजप करत असल्याचे सांगत बागवे म्हणाले की, काँग्रेसचे विचार महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित आहेत. गोरगरीब, कष्टकरी आणि झोपडपट्टीतील नागरिकांपर्यंत विकास पोहोचवणे हाच काँग्रेसचा आत्मा आहे.पाणी, वीज, पक्की घरे आणि मूलभूत सुविधा देण्याची क्षमता केवळ काँग्रेसकडेच असून महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलली जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुणे शहरात भाजपचे शंभर नगरसेवक असतानाही शहराची ओळख गुन्हेगारीशी जोडली जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.कोणत्याही आमिषाला बळी न पडता काँग्रेसच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.यावेळी माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे यांच्यासह जुबेर शेख, मधुकर चांदणे, बाळू कसबे, पप्पू माने, राजू भरगुडे, मारुती जाधव, इम्तियाज शेख, इमरान शेख, सुरज माने, नवाज शेख, सलीम सय्यद, काळूराम हांडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button