प्रभाग ९ चा विकास आराखडा आणि ‘जनहितनामा’ उद्या प्रसिद्ध; अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रकाशन

पुणे : प्रभाग क्रमांक ९ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रभागातील पूर्ण झालेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा आणि नागरिकांच्या अपेक्षांवर आधारित पुढील कृती आराखडा मांडणारा ‘प्रगती अहवाल’ आणि जनतेच्या हिताचा ‘जनहितनामा’ उद्या अधिकृतपणे प्रकाशित होणार आहे.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मा. अजितदादा पवार यांच्या हस्ते या प्रगती अहवालाचे प्रकाशन होणार असून, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चारही उमेदवार सौ. गायत्री मेढे-कोकाटे, श्री. बाबुराव चांदेरे, सौ. पार्वती निम्हण आणि श्री. अमोल बालवडकर उपस्थित राहणार आहेत.

या प्रगती अहवालात प्रभागातील पाणीपुरवठा व्यवस्था, रस्ते सुधारणा, वाहतूक नियोजन, स्वच्छता अभियान, स्मार्ट सुविधा, नागरिक सेवा केंद्रे, आरोग्यसेवा, विविध जनहित उपक्रम आणि सार्वजनिक पायाभूत सुविधा यासह झालेल्या विकासकामांचा व्यापक आणि व्यवस्थित आढावा घेण्यात आला आहे. यासोबतच प्रभागाच्या वाढत्या गरजा आणि भविष्यातील प्राधान्यक्रमांबाबत स्पष्ट दिशा देण्यात आली आहे.

या जनहितनाम्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तो पूर्णपणे जनतेच्या सहभागातून तयार करण्यात आला आहे. प्रभागातील पाच हजारांहून अधिक नागरिकांची मते, तसेच रहिवासी संस्था, नागरिक संघटना आणि विविध सिटिझन ग्रुप्स यांच्या सूचना, समस्या आणि अपेक्षा नोंदवून हा दस्तऐवज तयार करण्यात आला आहे.

जनतेने ज्या मुद्द्यांना प्राधान्य दिले, जिथे तातडीने बदल अपेक्षित आहे आणि ज्याचा थेट लाभ नागरिकांना होणार आहे, अशा सर्व बाबींना या जनहितनाम्यात स्थान देण्यात आले आहे. जनतेचे हक्क, गरजा आणि हित केंद्रस्थानी ठेवून हा आराखडा आखण्यात आला आहे.

प्रभाग ९ मधील प्रत्येक नागरिकासाठी, त्यांच्या कुटुंबासाठी आणि भविष्यासाठी हा प्रगती अहवाल आणि जनहितनामा दिशादर्शक ठरणार असून विकासाबाबतची ठाम बांधिलकी दर्शवणारा दस्तऐवज असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button