
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २४ (कसबा गणपती, कमला नेहरू रुग्णालय परिसर) मधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार गणेश बिडकर आणि त्यांच्या पॅनलमधील उमेदवारांनी नागरिकांसमोर आपले विकासाचे संकल्पपत्र जाहीर केले आहे. या संकल्पपत्रात प्रभागातील मूलभूत समस्या सोडवण्यावर भर देण्यात आला असून, वाहतूक नियोजन, आरोग्यसुविधा, पाणीप्रवाह व्यवस्था, सुरक्षा आणि प्राचीन वारसा संवर्धन यांना प्राधान्य देण्यात आले आहे.
या संकल्पपत्राची प्रमुख वैशिष्ट्ये मांडताना बिडकर म्हणाले की, शहरातील मोठ्या प्रकल्पांसोबतच प्रभाग पातळीवर ठोस आणि परिणामकारक विकास साध्य करण्याचा आमचा निर्धार आहे. याच अनुषंगाने ‘संविधान सन्मान अभ्यासिका’ सुरू करण्याचा विशेष संकल्प या संकल्पपत्रात करण्यात आला आहे. या अभ्यासिकेमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शांत, सुसज्ज आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आरोग्य सुविधांबाबत बोलताना बिडकर यांनी कमला नेहरू रुग्णालयातील सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाईल, असे स्पष्ट केले. रुग्णालयातील पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि रुग्णसेवा सुधारण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून ठोस उपाययोजना राबवण्यात येतील.
वाहतुकीच्या समस्येवर उपाय सुचवताना बिडकर म्हणाले की, मेट्रोच्या विस्तारीकरणामुळे प्रभागातील नागरिकांना शहरभर सुलभ व आरामदायी प्रवास करता येईल. तसेच इलेक्ट्रिक बस सेवा आणि पुण्यदर्शन सेवा पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
पावसाळ्यातील पाणी साचण्याच्या समस्येसाठी नाल्यांना सीमाभिंती बांधणे, कल्व्हर्ट सुधारणा आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. प्रभाग हा मूळ शहराचा भाग असल्याने रस्ते रुंदीकरणाला मर्यादा आहेत. त्यामुळे पार्किंग व्यवस्थापन आणि गर्दीच्या वेळी वाहतूक नियंत्रणासाठी विशेष नियोजन केले जाईल, असे बिडकर यांनी सांगितले.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि पेट्रोलिंग वाढवली जाईल, तसेच प्राचीन वारसास्थळांचे जतन व संवर्धन हा एक महत्त्वाचा उपक्रम राबवला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“दिलेला शब्द पाळणे आणि नागरिकांचे प्रश्न सोडवणे हे आमचे कर्तव्य आहे. मेट्रो, नदीकाठ सुधारणा, २४ तास पाणीपुरवठा यांसारख्या शहरातील प्रकल्पांचा थेट लाभ प्रभाग २४ मधील नागरिकांना मिळेल,” असा विश्वास बिडकर यांनी व्यक्त केला.
दरम्यान, संविधान सन्मान अभ्यासिकेच्या संकल्पनेबाबत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आनंद व्यक्त करत या उपक्रमाचे कौतुक केले आहे. भीमनगर आणि मंगळवार पेठेतील जनतेशी संवाद साधताना आठवले म्हणाले,
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी, पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी महायुती एकत्र उभी आहे. महायुतीच्या चारही उमेदवारांना निवडून द्या. महायुती ही आपलीच आहे.”