
पुणे : बोपोडी परिसराचा विकास केवळ स्मार्ट सिटीच्या चौकटीत मर्यादित न ठेवता नागरिकांना आरोग्यपूर्ण, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण जीवनशैली मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही भारतीय जनता पक्ष–रिपब्लिकन पक्ष (आठवले) युतीचे उमेदवार चंद्रशेखर उर्फ सनी विनायक निम्हण यांनी दिली.
बोपोडी परिसरात आयोजित पदयात्रेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रभाग क्रमांक ८ मधील भाजप–रिपाइं (आठवले) युतीचे उमेदवार परशुराम वाडेकर, भक्ति गायकवाड, सपना छाजेड यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निम्हण म्हणाले की, बोपोडी परिसरात सुसज्ज अंतर्गत रस्ते, सुरक्षित पदपथ, सुशोभित उद्याने व आधुनिक क्रीडांगणे यांसारख्या स्मार्ट शहरासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. त्याचबरोबर नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत उत्तम आरोग्य सेवा, स्वच्छ हवा, सुरक्षित व शुद्ध पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात येईल.
“आरोग्यपूर्ण आणि सुरक्षित वातावरण हाच खरा शाश्वत नगरविकासाचा पाया आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
माझे राजकारण विभाजनाचे नाही तर विश्वासाचे आणि विकासाचे आहे. कार्यसम्राट आमदार विनायक निम्हण यांचे संस्कार माझ्यावर असल्याने निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासने प्रामाणिकपणे पूर्ण करण्याची जबाबदारी मी स्वीकारतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
निवडून आल्यानंतर विकासकामांसाठी १०० दिवसांचा कालबद्ध कृती आराखडा तयार करण्यात येईल व त्या कामांची प्रगती नियमितपणे नागरिकांसमोर मांडली जाईल, असे आश्वासनही सनी निम्हण यांनी दिले.