
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ ड (सुस–बाणेर–पाषाण) परिसरात सुशिक्षित, कर भरणाऱ्या नागरिकांनी अभियंता सुदर्शन जगदाळे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत आपला स्पष्ट कौल दिला आहे.
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, म्हाळुंगे आदी परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये राहणारे अभियंते, सॉफ्टवेअर व्यावसायिक, उद्योजक व नोकरदार नागरिक मोठ्या संख्येने जगदाळे यांना समर्थन देत आहेत.
गेल्या २० ते २५ वर्षांपासून या भागातील नागरिकांना रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, वाहतूक नियोजन आणि सुरक्षितता यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव सहन करावा लागत असल्याची तीव्र नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे. विकासाच्या नावाखाली केवळ घोषणाबाजी झाली; मात्र प्रत्यक्षात प्रश्न सुटले नाहीत, अशी भावना नागरिकांमध्ये आहे.
विशेषतः रात्री अपरात्री फटाक्यांचे आवाज, मोठ्या आवाजातील DJ, सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन धिंगाणा, सिग्नलवर नागरिकांना त्रास देणारे कार्यकर्ते तसेच मुलींच्या छेडछाडीच्या घटनांमुळे परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या सर्व प्रकारांमुळे पोलिसिंग यंत्रणेचा अभाव प्रकर्षाने जाणवत असून, सर्वसामान्य नागरिक भयभीत वातावरणात जीवन जगत असल्याची खंत व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर अभियंता, सॉफ्टवेअर क्षेत्राचा अनुभव असलेले आणि सोसायटी स्तरावर प्रत्यक्ष काम केलेले उमेदवार म्हणून सुदर्शन जगदाळे यांच्याकडे नागरिक आशेने पाहत आहेत. नियोजन, शिस्त आणि प्रशासनाची जाण असलेला प्रतिनिधीच या प्रभागाला दिशा देऊ शकतो, असे नागरिकांचे स्पष्ट मत आहे.
“आता केवळ घोषणाबाजी नको; व्यवस्थेला समजणारा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी खंबीरपणे उभा राहणारा नगरसेवक हवा,” अशी भावना व्यक्त करत नागरिकांनी सुदर्शन जगदाळे यांना आपला पसंतीचा उमेदवार म्हणून पुढे आणले आहे.