
पुणे : दिल्ली आणि पंजाबमध्ये यशस्वीपणे राबवलेल्या शाळा, आरोग्य आणि वाहतूक क्षेत्रातील लोकाभिमुख धोरणांच्या जोरावर आम आदमी पार्टीने (आप) पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आपले निर्धारपत्र जाहीर केले. “नक्कल नको, अस्सल आणा” आणि “गैरकारभारातून जबाबदार, भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाकडे बदल घडवूया” असे आवाहन पुणेकरांना करण्यात आले आहे.
पुण्यामध्ये आम आदमी पार्टीचे ८५ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, यातील बहुसंख्य उमेदवार हे सुशिक्षित युवक वर्गातील असल्याचे सांगण्यात आले.
आज पुण्यातील पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी हे निर्धारपत्र जाहीर केले. पुणेकरांसाठी दरडोई उत्पन्न वाढवणारे रोजगार, महिलांसाठी दिल्ली–पंजाबच्या धर्तीवर मोफत बस प्रवास, तसेच धोरणात्मक व दीर्घकालीन निर्णय घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
वाहतूक कोंडीमुळे होणारी वेळ, इंधन व मानसिक त्रास कमी करण्यासाठी “३० मिनिटांत ऑफिस आणि ३० मिनिटांत घरी” ही संकल्पना राबवण्यात येणार असून, त्यासाठी मिसिंग लिंक रोड आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, असेही सांगण्यात आले.
शिक्षण क्षेत्रात सर्व सरकारी शाळा खाजगी शाळांच्या तोडीच्या बनवून उच्च दर्जाच्या सुविधा व माफक दरात शिक्षण दिले जाईल.
आरोग्यासाठी ५०० मीटर अंतरावर मोफत प्राथमिक आरोग्य सुविधा देणारे मोहल्ला क्लिनिक, तसेच “महापालिका तुमच्या दारात” योजनेअंतर्गत नागरिकांना आवश्यक कागदपत्रे पारदर्शक पद्धतीने घरपोच दिली जातील.
प्रत्येक घराला पुरेसे पाणी, सामाविष्ट गावांमध्ये मूलभूत सुविधांना प्राधान्य, रस्ते व पाणीपुरवठ्यासाठी वाढीव निधी, प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर उपाय आणि भयमुक्त शहरासाठी विविध योजना राबवण्यात येतील, असेही मुकुंद किर्दत यांनी सांगितले.
यावेळी शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी पुणेकरांच्या समस्या मांडत भाजप–राष्ट्रवादी युतीवर टीका केली. “नागरिकांच्या करातून जमा होणारा प्रत्येक पैसा योग्य ठिकाणी आणि पूर्ण पारदर्शकतेने खर्च केला जाईल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
या पत्रकार परिषदेला आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत, शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, महिला अध्यक्ष सुरेखा भोसले, महासचिव अक्षय शिंदे, सुभाष कारंडे, सुनील सवदी आदी पदाधिकारी उपस्थित होते.