
पुणे, : पुणे शहरातील मागील सत्ताधारी भाजपने महापालिकेला भ्रष्टाचाराच्या गर्तेत ढकलले असून शहराच्या मूलभूत प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. परिणामी पुणे शहराची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून गुंडगिरी, अमली पदार्थ, वाहतूक कोंडी आणि भ्रष्टाचार या समस्यांनी शहराला घेरले आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी नागरिकांनी एकदा काँग्रेस पक्षाला संधी द्यावी, असे आवाहन माजी महसूलमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले.
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १२ मधील गोलंदाज चौक, वडारवाडी येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. थोरात म्हणाले की, काँग्रेस पक्षाने यंदा पुणे शहरातील विविध प्रभागांत तरुण, तडफदार आणि काम करण्याची क्षमता असलेले उमेदवार दिले आहेत. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांनी काँग्रेस उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार दीप्ती चवधरी, प्रदेश वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस विजयसिंह चौधरी यांच्यासह उमेदवार राजश्री अडसूळ, ऋषिकेश जाधव, प्रियंका पवार, जावेद निलगर आदी उपस्थित होते. तसेच राहुल वंजारी, संजय मोरे, ॲड. फैय्याज शेख, विलास कांबळे, बुवा कांबळे, महेंद्र पवार, राज निकम, गणेश गुगळे, राजू बजेरी, नारायण पाटोळे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी सांगितले की, ही निवडणूक दोन विचारधारांमधील लढाई आहे. काँग्रेसची पुरोगामी विचारधारा असून भाजप मनुवादी, जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणारी आहे. भाजप सत्तेचा गैरवापर करून लोकशाही कमकुवत करत असून पुणे शहराला अमली पदार्थ, गुंडगिरी, टेंडर लॉबी आणि भ्रष्टाचाराची ओळख मिळवून दिली आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास भाजपच्या गैरव्यवहारांची श्वेतपत्रिका काढली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
माजी आमदार दीप्ती चवधरी म्हणाल्या की, काँग्रेसच्या काळात पुण्यात विकास आणि सुशासन होते. बेरोजगारी, महिला अत्याचार आणि अमली पदार्थांचे वाढते प्रमाण यासाठी भाजप जबाबदार आहे. पंतप्रधानांनी दिलेली रोजगाराची आश्वासने पूर्ण झाली नसून तरुणाई निराशेत ढकलली गेली आहे. पुण्याचे गतवैभव पुन्हा मिळवण्यासाठी काँग्रेसला बळ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक राजेश मारणे यांनी केले.