शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधांवर भर देणारा आबा बागुल यांचा विकासाभिमुख जाहीरनामा प्रसिद्ध

आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी नागरिकांसमोर आपला जाहीरनामा जाहीर केला. शिक्षण, आरोग्य आणि भौतिक सुविधा सक्षम करण्याचा ठाम निर्धार या जाहीरनाम्यात मांडण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार व आधुनिक शिक्षणव्यवस्था, शाळांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करणे, तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. डिजिटल व आधुनिक शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा संकल्प आबा बागुल यांनी व्यक्त केला.

आरोग्य क्षेत्रात प्रत्येक वस्तीमध्ये प्राथमिक दवाखाने सुरू करणे, महिलांसाठी स्वतंत्र व विशेष आरोग्य सेवा, मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.

भौतिक सुविधांच्या बाबतीत स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा, सक्षम ड्रेनेज व्यवस्था, सुस्थितीत रस्ते, पथदिवे, प्रभावी कचरा व्यवस्थापन आणि सुरक्षित सार्वजनिक जागा उभारण्यावर भर देण्यात आला आहे.

“शहरातील सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावणे आणि मूलभूत सुविधा थेट लोकांपर्यंत पोहोचवणे हाच माझा मुख्य उद्देश आहे,” असे आबा बागुल यांनी सांगितले. अनुभव आणि विकासाभिमुख दृष्टिकोनाच्या जोरावर नागरिकांचा विश्वास पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न त्यांनी या जाहीरनाम्यातून केला असून नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button