मराठा समाजाने गिरीराज सावंत यांच्या पाठीशी ठाम उभे राहावे – गंगाधर काळकुटे यांचे आवाहन

पुणे : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यात खंबीरपणे पाठीशी उभे राहिलेले, आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आर्थिक आधार देणारे आणि समाजातील गरजू घटकांसाठी सतत मदतीचा हात पुढे करणारे माजी मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा योग्य काळ असून, त्यांचे पुत्र गिरीराज सावंत यांच्या पाठीशी संपूर्ण मराठा समाजाने ठामपणे उभे राहावे, असे आवाहन सकल मराठा समाजाचे नेते गंगाधर काळकुटे यांनी केले.

गिरीराज सावंत यांचा विजय हा केवळ एका उमेदवाराचा विजय नसून तो समाजसेवेच्या विचारांचा विजय असेल, असे स्पष्ट मत काळकुटे यांनी व्यक्त केले. संकटाच्या काळात समाजाला सावरणाऱ्या हातांना बळ देणे हे आपले कर्तव्य असल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी यशवंत सेनेचे विष्णू कुऱ्हाडे, छावा संघटनेचे अशोक रोमन यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

गंगाधर काळकुटे म्हणाले, “माजी आरोग्यमंत्री व ‘मराठा भूषण’ प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी समाजसेवेचा आदर्श वस्तुपाठ महाराष्ट्रासमोर ठेवला आहे. त्याच सामाजिक वारशाला गिरीराज सावंत पुढे नेत आहेत. त्यांच्या संवेदनशीलतेची आणि कार्यक्षमतेची दखल घेत सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांना या निवडणुकीत खंबीर पाठिंबा जाहीर करण्यात येत आहे.”

मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या तरुणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ३ ते ५ लाख रुपयांची मदत, तसेच आतापर्यंत सुमारे ७०० कुटुंबांचे पालकत्व स्वीकारून डॉ. तानाजी सावंत यांनी समाजाला आधार दिला आहे. शिक्षण, फी, नोकरी, आरोग्य आणि विवाहापर्यंतची जबाबदारी त्यांनी स्वतः उचलली आहे. मराठा समाजासह ओबीसी आणि धनगर समाजातील आत्महत्याग्रस्त कुटुंबांनाही त्यांनी तितक्याच तत्परतेने मदत केली आहे.

हीच समाजसेवेची परंपरा पुढे नेत गिरीराज सावंत हे ‘कार्यसिद्धी प्रतिष्ठान’च्या माध्यमातून सातत्याने कार्यरत आहेत. वर्षातील ३६५ दिवस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख असून, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपासून ते आरोग्यविषयक अडचणी सोडवण्यापर्यंत त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. प्रभाग क्रमांक ३७ च्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्वसामान्यांचा आवाज महापालिकेत पोहोचवण्यासाठी गिरीराज सावंत यांना निवडून देणे ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button