
पुणे, दि. 11 : सर्वसामान्य जनतेचे हित जपणे हाच काँग्रेस पक्षाचा खरा विचार असून, तोच विचार घेऊन आम्ही पुणे महापालिका निवडणुकीला सामोरे जात आहोत. त्यामुळे काशेवाडी, लोहियानगर व डायस प्लॉट भागाचा परिपूर्ण आणि शाश्वत विकास करणे हाच आमचा प्रमुख ध्यास आहे, असे प्रतिपादन माजी नगरसेवक अविनाश बागवे यांनी केले.
पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रभाग क्रमांक २२ मधील अखिल भारतीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार इंदिरा अविनाश बागवे, अविनाश बागवे, रफीक शेख आणि दिलशाद शेख यांनी आज काशेवाडी परिसरात पदयात्रा काढून नागरिकांशी थेट संवाद साधला. या पदयात्रेच्या समारोप सभेत अविनाश बागवे बोलत होते.
यावेळी बागवे म्हणाले की, काशेवाडी, लोहियानगर व डायस प्लॉट हा भाग प्रामुख्याने झोपडपट्टीचा असून, येथे शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता या मूलभूत सुविधांची नितांत गरज आहे. या भागातील प्रत्येक नागरिक माझ्या कुटुंबातील सदस्यासारखा आहे. त्यामुळे या परिसराचा सर्वांगीण विकास करणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट राहणार आहे. नागरिकांनी आमच्यावर विश्वास ठेवून प्रेमाने पाठीशी उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी उमेदवार इंदिरा अविनाश बागवे, रफीक शेख आणि दिलशाद शेख यांनीही आपल्या मनोगतातून मतदारांशी संवाद साधत विकासाभिमुख विचार मांडले.
आज काशेवाडी एसआरए प्रकल्प व परिसरात झालेल्या पदयात्रेत उमेदवारांनी नागरिकांशी मुक्तपणे संवाद साधला. या पदयात्रेला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या पदयात्रेत जुबेरबाबू शेख, यासेर बागवे, चंद्रकांत चव्हाण, कविराज संघेलिया, मुन्नाभाई शेख, रोपभाई शेख, आरिफ शेख, विठ्ठल थोरात, दयानंद अडागळे, शफीक शेख, मारुती कसबे यांच्यासह अखिल भारतीय काँग्रेस पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व मित्रपक्षांचे अनेक नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.