
पुणे : जुने वाडे आणि ऐतिहासिक परिसरासाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक २५ (शनिवार पेठ–महात्मा फुले मंडई) येथे वाडे व सोसायट्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. या समस्येवर शाश्वत आणि नागरिकाभिमुख उपाय म्हणून स्वतंत्र ‘रिडेव्हलपमेंट फोरम’ स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी दिली.
प्रभाग २५ मध्ये प्रचारार्थ नागरिकांशी संवाद फेरीदरम्यान ते बोलत होते. या परिसरात मोठ्या प्रमाणावर जुने वाडे व सोसायट्या असून पुनर्विकास प्रक्रियेत अनेक कायदेशीर, तांत्रिक व प्रशासकीय अडचणी येतात. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना या कामासाठी वारंवार सरकारी कार्यालयांच्या चकरा माराव्या लागतात.
या अडचणी लक्षात घेता, पुनर्विकासासाठी आवश्यक कायदेशीर सल्ला, आवश्यक कागदपत्रांची माहिती, कायदेशीर मदत तसेच डिम्ड कन्व्हेन्स (मानीव अभिहस्तांतरण) प्रक्रियेबाबत मार्गदर्शन देण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला जाणार आहे. या ‘रिडेव्हलपमेंट फोरम’च्या माध्यमातून सोसायट्या आणि वाडेमालकांना एकाच ठिकाणी योग्य मार्गदर्शन मिळणार असून ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मानकर यांनी स्पष्ट केले.
प्रभाग क्रमांक २५ मधून राघवेंद्र बाप्पु मानकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक आणि स्वप्नाली पंडित हे निवडणूक रिंगणात आहेत. रविवारी हेमंत रासने यांच्या प्रमुख उपस्थितीत महात्मा फुले मंडईतील व्यापाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. तसेच, रविवारचा सुट्टीचा दिवस असल्याने शनिवार पेठ, नारायण पेठ आणि बुधवार पेठ परिसरात पदयात्रा काढून नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला.