शहरात मोफत प्रवासाची घोषणा दिशाभूल करणारी – अजित पवारांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह

पुणे दि. 11 : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जाहीरनामा मांडताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्याची गरज व्यक्त केली. यासाठी पीएमपीएमएल बससेवा आणि मेट्रो प्रवास मोफत करण्याची घोषणा त्यांनी केली.

अजित पवार यांच्या मते, महापालिकेने पीएमपीएमएल कंपनीला दरवर्षी २४० कोटी रुपये आणि मेट्रोसाठी ६० कोटी रुपये दिल्यास नागरिकांना मोफत प्रवास देता येईल. मात्र, या घोषणेवर सामाजिक कार्यकर्ते विशाल विमल यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.

पीएमपीएमएल ही पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांची सार्वजनिक बस वाहतूक करणारी कंपनी असून तिचा वार्षिक तोटा तब्बल ८८५ कोटी रुपये आहे. या तोट्याची भरपाई पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून केली जाते. अशा परिस्थितीत केवळ २४० कोटी रुपये घेऊन पीएमपीएमएल नागरिकांना मोफत बस प्रवास कसा देणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

“आधीच प्रचंड आर्थिक तोट्यात असलेल्या पीएमपीएमएलवर मोफत प्रवासाची जबाबदारी टाकणे म्हणजे नागरिकांची दिशाभूल आहे,” असे मत विशाल विमल यांनी व्यक्त केले. निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आलेली ही घोषणा व्यवहार्य नसून ती फक्त मतदारांना आकर्षित करण्यासाठी असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button