
पुणे : बांधकाम उद्योगाचे भविष्य सुरक्षित आणि शाश्वत करायचे असेल, तर नवोन्मेष स्वीकारून पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करणे अत्यावश्यक आहे, असा ठाम सूर ‘कन्स्ट्रो २०२६’ या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात आयोजित चर्चासत्रात तज्ज्ञांनी व्यक्त केला. सिमेंटच्या अतिवापरामुळे पर्यावरणावर मोठा ताण येत असून, तो कमी करण्यासाठी फ्लाय ऍशसारख्या पर्यायांचा वापर वाढवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जे. कुमार डिफेन्स अँड एअरोस्पेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी युसूफ इनामदार यांनी केले.
पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग रिसर्च फाऊंडेशन (पीसीईआरएफ), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात आयोजित ‘कन्स्ट्रो २०२६’ या चार दिवसीय विसाव्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ‘भारतीय बांधकाम उद्योगाचे भविष्य’ या विषयावर हे चर्चासत्र झाले.
इनामदार यांनी सांगितले की, पुणे शहरात दरवर्षी सुमारे ८ दशलक्ष टन सिमेंट वापरले जाते. सिमेंटसोबत मोठ्या प्रमाणावर पिण्याचे पाणीही वापरले जाते. त्यामुळे सिमेंटऐवजी फ्लाय ऍशचा आणि पिण्याच्या पाण्याऐवजी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर करणे काळाची गरज आहे. प्रगत तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या साहाय्याने बांधकाम प्रकल्प कमी कालावधीत आणि अधिक गुणवत्तेने पूर्ण करता येतात, असेही त्यांनी नमूद केले.
इंडिया प्लम्बिंग असोसिएशनचे माजी अध्यक्ष सुभाष देशपांडे म्हणाले, “शासनाची धोरणे अधिक कठोर होत असल्याने प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर अनिवार्य ठरणार आहे. नव्या धोरणांनुसार विकासकांना पाण्याचा ताळेबंद (वॉटर बॅलन्स शीट) सादर करावा लागणार आहे. पावसाचे पाणी साठवण्यासाठी सायफॉनिक पाइप्सचा वापर आणि पाण्याचा प्रवाह नियंत्रित करणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास पाण्याचा वापर निम्म्याहून अधिक कमी होऊ शकतो.”
शुभम ईपीसीच्या संचालिका अर्चना बडेर म्हणाल्या, “भारतीय बांधकाम उद्योग मजुरीवर आधारित पद्धतीतून स्वयंचलन आणि आता ‘रिअल-टाइम’ युगात आला आहे. वेग, गुणवत्ता आणि मजबुती साधण्यासाठी काळानुरूप बदल स्वीकारणे अत्यंत महत्त्वाचे आहे.”
पीसीईआरएफचे उपाध्यक्ष जयंत इनामदार यांनी संरचनात्मक स्टीलच्या वापरावर भर दिला. स्टील स्ट्रक्चरमुळे कार्पेट क्षेत्रात सुमारे ४० टक्क्यांनी वाढ होते, वेळेची बचत होते आणि ८० ते ९० टक्के साहित्य पुनर्वापरयोग्य असते, असे त्यांनी सांगितले.
प्रीकास्ट इंडिया इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक अजित भाटे यांनी प्रीकास्ट कॉलम आणि भिंतींच्या वापरामुळे वेळ वाचतो आणि गुणवत्तेत सातत्य राखता येते, असे स्पष्ट केले. ‘कन्स्ट्रो २०२६’चे चेअरमन जयदीप राजे यांनीही उद्योगाच्या भविष्यासंदर्भात विचार मांडले.
या चर्चासत्राला तरुण अभियंते, अभियांत्रिकीचे विद्यार्थी आणि बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनोज देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.