औंध–बोपोडी परिसराच्या विकासाला गती देणार; मेट्रो शटल बस व नदीपात्र विकासाला प्राधान्य – सनी विनायक निम्हण

पुणे : महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ, वेगवान आणि सुविधाजनक करणाऱ्या विकासात्मक प्रकल्पांवर भर देणार असल्याचा ठाम निर्धार भारतीय जनता पक्ष–रिपब्लिकन पक्ष (आठवले) युतीचे औंध–बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मधील उमेदवार चंद्रशेखर उर्फ सनी विनायक निम्हण यांनी व्यक्त केला.

औंध येथील औंध रोड सोसायटी असोसिएशन, एम.एम. हॉटेलच्या सभागृहात परिसरातील नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, प्रभाग क्रमांक ८ मधील भाजप–रिपाइं (आठवले) युतीचे उमेदवार परशुराम वाडेकर, भक्ति गायकवाड, सपना छाजेड यांच्यासह औंध रोड परिसरातील विविध सोसायट्यांमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सनी निम्हण म्हणाले, बोपोडीतून एक आणि बाणेर फाट्यावरून दुसरा असा दोन मेट्रो मार्ग परिसरातून जात आहेत. या मेट्रो प्रकल्पांचा थेट लाभ बोपोडी व औंधमधील नागरिकांना मिळावा, तसेच दैनंदिन बाजारहाट व प्रवास सुलभ व्हावा यासाठी मेट्रो स्थानकांना जोडणारी वर्तुळाकार शटल बस सेवा सुरू करण्यात येईल. या सेवेमुळे प्रभागातील कोणत्याही भागातून अवघ्या २० ते २५ मिनिटांत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचणे शक्य होणार असून वेळ आणि पैशांची मोठी बचत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यासोबतच प्रभागातील नदीपात्र परिसराच्या नियोजनबद्ध व पर्यावरणपूरक विकासालाही प्राधान्य देण्यात येणार असल्याचे निम्हण यांनी स्पष्ट केले. नदीपात्र विकास करताना पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही, याची विशेष दक्षता घेतली जाईल आणि हा प्रकल्प पूर्णपणे पर्यावरणस्नेही पद्धतीने राबवला जाईल, असा दावा त्यांनी केला.

आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, सनी निम्हण हे राजकीय परंपरेतून आलेले, उच्चशिक्षित आणि जबाबदार नेतृत्व आहे. त्यांचे वडील माजी आमदार विनायक निम्हण यांनी या भागाचे सलग तीन वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केले असून नगरसेवक म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. सनी निम्हण हे आगामी काळात कालबद्ध पद्धतीने नागरिकांची कामे पूर्ण करतील, याची खात्री त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button