
पुणे : काँग्रेस व इतर पक्षांवर घराणेशाहीच्या मुद्द्यावर सातत्याने टीका करणाऱ्या भारतीय जनता पक्षालाच आता त्याच मुद्द्यावर तोंडघशी पडावे लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतणीला उमेदवारी नाकारणाऱ्या भाजपने, दुसऱ्या पक्षातून आयात झालेल्या पठारे कुटुंबाला मात्र महापालिका निवडणुकीत तब्बल तीन उमेदवारांची तिकिटे देत स्वतःच्या भूमिकेलाच हरताळ फासला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांची कन्या सोनल मोदी यांनी अहमदाबाद महापालिकेच्या एका प्रभागातून उमेदवारी मागितली होती. मात्र, घराणेशाहीचा आरोप होऊ नये म्हणून आमदार, खासदार व बड्या नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी न देण्याचा निर्णय भाजप नेतृत्वाने घेतला. याच निर्णयाअंतर्गत सोनल मोदी यांची उमेदवारी नाकारण्यात आली. मात्र, ही उमेदवारी केवळ घराणेशाहीमुळे नाकारली की त्यांच्याकडे पुरेशी संपत्ती नसल्यामुळे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
दुसरीकडे, बाहेरच्या पक्षातून भाजपात आलेले आमदार बापू पठारे यांनी आपल्या कुटुंबातील तिघांना उमेदवारी मिळवून देत भाजपच्या नियमालाच अपवाद पाडला आहे. पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक चारमधून आमदारांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे आणि भाचे-सून तृप्ती भरणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर प्रभाग क्रमांक तीनमधून सून ऐश्वर्या पठारे यांना तिकीट देण्यात आले आहे. या निर्णयामुळे प्रभागातील निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी असून, त्यांनी नेहमीप्रमाणे सतरंज्या गुंडाळण्यास सुरुवात केली आहे.
विशेष म्हणजे, या महापालिका निवडणुकीत सुरेंद्र पठारे हे सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांच्या नावावर तब्बल २७१ कोटी ८५ लाख रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता असून, त्यामध्ये आलिशान गाड्या, मोठ्या प्रमाणावर जमिनी आणि महागड्या सदनिकांचा समावेश आहे. हीच आर्थिक ताकद भाजपच्या नियमाला अपवाद ठरण्याचे कारण असल्याची चर्चा पक्षांतर्गत सुरू आहे.
त्याचप्रमाणे लोहगाव परिसरातील जमिनीवरील आरक्षणे काढण्यासाठी एका केंद्रीय मंत्र्यांचा वापर करण्यात आल्याचीही जोरदार चर्चा आहे. या प्रक्रियेत मोठ्या आर्थिक व्यवहारांची देवाणघेवाण झाल्याचे बोलले जात आहे. एवढ्या मोठ्या व्यवहारांची क्षमता नसल्यानेच भाजपने पठारे कुटुंबासाठी अपवाद केला, असे मत निष्ठावान कार्यकर्ते आणि परंपरागत मतदारांमध्येही मनोमन रुजत आहे.
घराणेशाहीविरोधी भाषणांची कढी रोज शिजवणाऱ्या भाजपने प्रत्यक्षात मात्र उमेदवारीचा बोलाचाच भात शिजवल्याचा आरोप आता खुलेआम होत आहे.