अजित पवारांची मोफत प्रवासाची घोषणा फसवी; एकट्याने निर्णयाचा अधिकार नाही – चंद्रकांतदादा पाटील

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहिरनाम्यात पीएमपीएमएल बस व मेट्रोमध्ये मोफत प्रवासाची केलेली घोषणा फसवी असून, ती राज्य सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विश्वासात न घेता करण्यात आली आहे, असा आरोप राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केला आहे.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, अमोल कविटकर आणि पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते. पाटील म्हणाले की, ही घोषणा ऐकायला आकर्षक असली तरी राज्य सरकारच्या निर्णयाशिवाय ती अमलात आणणे शक्य नाही. अजित पवार यांना एकट्याने अशा घोषणा करण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

बिहार निवडणुकीत काँग्रेसने अशाच प्रकारच्या फसव्या घोषणा केल्या होत्या. मात्र सरकारच येणार नसल्याचे माहीत असल्याने अशा घोषणा करण्यात आल्या. महापालिकेत आपली सत्ता येणार नाही, याची जाणीव अजित पवार यांना असल्यानेच अशा घोषणा केल्या जात असल्याचा आरोप पाटील यांनी केला.

ही योजना चांगली असली तरी तिची अंमलबजावणी करण्यासाठी महायुती सरकारला सामूहिक निर्णय घ्यावा लागेल. केवळ श्रेय घेण्यासाठी मित्र पक्षांना विश्वासात न घेता अशा घोषणा करणे योग्य नाही, असेही पाटील म्हणाले. १९९९ साली मोफत वीज देण्याची घोषणा करून नंतर ‘प्रिंटिंग मिस्टेक’चा दावा करण्यात आला होता, त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असल्याचा टोमणाही त्यांनी मारला.

मुख्यमंत्रीपदाकडे संपूर्ण राज्याचे अधिकार असतात. केवळ एक बटण दाबून मोफत बस योजना लागू होऊ शकत नाही. महायुती हे तिघांचे सरकार असून कोणताही नेता स्वतंत्रपणे अशा घोषणा करू शकत नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

मेट्रो व पीएमपीएमएल बससेवा सध्या तोट्यात असताना, आर्थिक तरतूद व अंमलबजावणी याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. पुण्याचा पालकमंत्री असताना पीएमपीएमएलला सुमारे एक हजार कोटी रुपयांचा तोटा झाला होता. तसेच एमएनजीएलचे ६५ कोटी रुपये अद्याप थकीत असताना मोफत बस योजना कशी राबवणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपला अंतर्गत सर्व्हेनुसार ११५ जागा मिळतील आणि मायक्रो प्लॅनिंगमुळे हा आकडा १२५ पर्यंत जाईल, असा दावा चंद्रकांतदादा पाटील यांनी केला. निवडणुकीनंतर पुण्यात भाजपचाच महापौर होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button