पुणे प्रभाग ४० मध्ये निवडणुकीपूर्वी ३ हजार रुपये देण्याचा आरोप; आमदार योगेश टिळेकरांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

पुणे : पुणे शहरातील प्रभाग क्रमांक ४० मध्ये निवडणूक आचारसंहितेचा गंभीर भंग झाल्याचा आरोप करत स्थानिक नागरिक यश गजमल यांनी महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांनी मतदारांना आर्थिक प्रलोभन देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, १० जानेवारी २०२६ रोजी तक्रारदार यांच्या आईच्या मोबाईलवर आमदार योगेश टिळेकर यांच्या नावाने एक एसएमएस प्राप्त झाला. या संदेशात निवडणुकीच्या एक दिवस आधी म्हणजेच १४ जानेवारी रोजी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट ₹३,००० जमा केले जातील, असे नमूद करण्यात आले होते. तसेच मतदारांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

हा प्रकार थेट आर्थिक प्रलोभन देऊन मतदारांवर प्रभाव टाकण्याचा असल्याने तो लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ आणि आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. सरकारी योजनांचा किंवा सार्वजनिक निधीचा वापर निवडणूक फायद्यासाठी करणे हे लोकशाहीसाठी घातक असल्याचे तक्रारदाराने नमूद केले आहे.

या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधित आमदार आणि पक्षावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. तसेच अशा स्वरूपाचे रोख हस्तांतरण थांबवून मतदारांचे लोकशाही हक्क अबाधित ठेवावेत, असेही तक्रारीत नमूद आहे. आवश्यक पुरावे व स्क्रीनशॉट्स सादर करण्याची तयारी तक्रारदाराने दर्शवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button