
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात पीएमपीएमएल बससेवा आणि मेट्रोमध्ये मोफत प्रवासाची केलेली घोषणा ही फसवी असून, ती राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विश्वासात न घेता करण्यात आली आहे, असा आरोप राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केला. अशी कोणतीही घोषणा राज्य सरकारच्या संमतीशिवाय अमलात येऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, अमोल कविटकर आणि पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते. पाटील म्हणाले की, बिहार निवडणुकीत काँग्रेसने जशा फसव्या घोषणा केल्या होत्या, तसाच प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जात आहे. महापालिकेत सत्ता येणार नसल्याची जाणीव असल्यानेच अशा अव्यवहार्य घोषणा केल्या जात असल्याचा टोला त्यांनी लगावला.
ही योजना कागदावर चांगली वाटत असली, तरी तिच्या अंमलबजावणीसाठी महायुती सरकारचा एकत्रित निर्णय आवश्यक आहे. केवळ श्रेय घेण्यासाठी मित्र पक्षांना विश्वासात न घेता अशा घोषणा करणे योग्य नाही, असे पाटील म्हणाले. यापूर्वी १९९९ साली मोफत वीज देण्याच्या घोषणेनंतर ‘प्रिंटिंग मिस्टेक’चा बचाव करण्यात आला होता, तशीच परिस्थिती याही घोषणेबाबत उद्भवू शकते, असा चिमटाही त्यांनी काढला.मुख्यमंत्रीपदाकडे संपूर्ण राज्याचे अधिकार असतात. केवळ एका बटणावर मोफत बस किंवा मेट्रो योजना लागू होऊ शकत नाही. महायुती हे तिघांचे सरकार असून, कोणताही एक नेता स्वतंत्रपणे अशा प्रकारच्या घोषणा करू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.
मोफत प्रवासाच्या घोषणेमागील आर्थिक तरतूद, प्रक्रिया आणि अंमलबजावणी याबाबत कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही, अशी टीकाही पाटील यांनी केली. पीएमपीएमएल बससेवा सध्या तोट्यात असून, पुण्याचा पालकमंत्री असताना बससेवेचा सुमारे एक हजार कोटी रुपयांचा तोटा होता, याची आठवण त्यांनी करून दिली. तसेच एमएनजीएलचे ६५ कोटी रुपये अद्याप मनपाकडे थकीत असताना मोफत बस योजना कशी राबवणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
महिलांसाठी उच्च शिक्षणात ५० टक्के शुल्क माफीचा निर्णय घेण्यासाठी अजित पवार यांनी सहा महिने लावले होते आणि राज्याच्या तिजोरीवर ताण येतो, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. मात्र, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अशा मोठ्या घोषणा करणे आश्चर्यकारक असल्याचे पाटील म्हणाले.दरम्यान, पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपला अंतर्गत सर्व्हेनुसार ११५ जागा मिळत असून, प्रदेशाध्यक्षांच्या मायक्रो प्लॅनिंगमुळे हा आकडा १२५ पर्यंत जाईल, असा दावा चंद्रकांतदादा पाटील यांनी केला. निवडणुकीनंतर पुण्यात भाजपचाच महापौर होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.