‘एशियन कल्चर’ पुरस्काराने पद्मभूषण सई परांजपे सन्मानित; २२ व्या थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सवाचा भव्य प्रारंभ

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ तसेच राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (NFDC) यांच्या सहकार्याने आयोजित २२ व्या थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली.

या महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी (IAS), NFDC चे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम आणि पद्मभूषण दिग्दर्शिका सई परांजपे यांच्या हस्ते झाले. यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम, चैतन्य शांताराम, ज्युरी सदस्य सुप्रतिम भोल, सतीश जकातदार, प्रेमानंद मुजुमदार, कार्यकारिणी सदस्य श्रीकांत बोजेवार, फेस्टिव्हल डिरेक्टर संतोष पाठारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी सुप्रसिद्ध दिग्दर्शिका पद्मभूषण सई परांजपे यांना ‘आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. तसेच दिग्दर्शिका उमा दा कुन्हा यांना ‘सत्यजित रे स्मृती पुरस्कार’ देण्यात आला. महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आले.

पुरस्कार स्वीकारताना सई परांजपे म्हणाल्या, “हॉलिवूड चित्रपट सहज उपलब्ध असतात; मात्र आपल्या शेजारील आशियाई देशांतील चित्रपट पाहण्याची संधी अशा महोत्सवांमधून मिळते. या चित्रपटांमधून आपली संस्कृती अनुभवता येते. प्रत्येकाने या महोत्सवाचा आनंद घ्यावा.”

NFDC चे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी, “या महोत्सवामुळे सिनेप्रेमींना अनेक दर्जेदार आशियाई चित्रपट पाहण्याची संधी मिळते. सर्वांनी एकत्र येऊन हा महोत्सव यशस्वी करावा,” असे आवाहन केले.

सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी शासनाच्या कला व संस्कृतीविषयक सकारात्मक भूमिकेवर भर देत, “अशा महोत्सवांमुळे जागतिक पातळीवरील कलाकृती पाहण्याची संधी मिळते, नेटवर्किंग वाढते आणि कलेविषयीचा व्यापक दृष्टिकोन विकसित होतो,” असे सांगितले.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी सई परांजपे यांच्या सिनेसृष्टीतील योगदानाचे कौतुक करत त्यांच्या गौरवाबद्दल आनंद व्यक्त केला.

चित्रपती डॉ. व्ही. शांताराम यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त यावर्षीपासून उत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पण पुरस्कार सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम यांनी केली.

महोत्सवाची सुरुवात ‘ऑन युअर लॅप (पांगकू)’ या इंडोनेशियन चित्रपटाच्या प्रदर्शनाने झाली. १५ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या सात दिवसांच्या या महोत्सवात विविध आशियाई देशांतील दर्जेदार चित्रपट रसिकांना पाहता येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button