
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २३ (रविवार पेठ – नाना पेठ) येथील उमेदवारीवरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सोनाली वनराज आंदेकर यांना उमेदवारी देण्यात आल्याने विरोधकांकडून टीकेची झोड उठवण्यात येत आहे. मात्र या पार्श्वभूमीवर आंदेकर कुटुंबातील मुली आणि महिलांनी भावनिक होत, “आता कुठेतरी हे सगळं थांबलं पाहिजे,” अशी आर्त भावना व्यक्त केली आहे.
विरोधकांकडून विविध आरोप होत असले तरी प्रभागातील नागरिक आजही आंदेकर कुटुंबाने केलेल्या विकासकामांची आठवण काढत असल्याचा दावा कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. सध्या दोन्ही उमेदवार कारागृहात असल्याने त्यांच्या वतीने रिया वनराज आंदेकर, प्रज्ञा शिवम आंदेकर आणि प्रियांका कृष्णराज आंदेकर या घराघरांत जाऊन मतदारांशी संवाद साधत प्रचार करत आहेत.
यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेला आंदेकर कुटुंबीयांसह प्रभाग क्रमांक २३ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत कोठावले, खान शहाबाज महमंद शरीफ आदी उपस्थित होते.
प्रज्ञा आंदेकर म्हणाल्या, “आम्ही जिथे जिथे जातो, तिथे लोक आमच्या कुटुंबाने केलेल्या कामांची पोचपावती देतात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू. प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवणे आणि सुरू असलेली विकासकामे पुढे नेणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.”
रिया आंदेकर भावुक होत म्हणाल्या, “लहानपणी वडिलांचा प्रचार पाहिला. आज आई नसताना तिचा प्रचार करण्याची वेळ आली आहे. जे काही घडले, त्याची कल्पनाही आम्हाला नव्हती. आता हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे. वडिलांनी पाहिलेली स्वप्ने आम्हाला पूर्ण करायची आहेत,” असे सांगताना त्या भावुक झाल्या.
प्रियांका आंदेकर म्हणाल्या, “प्रचारादरम्यान मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. आमच्या कुटुंबीयांनी केलेल्या कामाचीच ही पोचपावती असून, त्याच विश्वासातून आजितदादांनी पुन्हा उमेदवारी दिली आहे. विरोधक काहीही बोलत असले तरी प्रभागात आंदेकरांचे काम आजही बोलते, हे वास्तव आहे.”