
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून प्रभाग क्रमांक २४ मध्ये भारतीय जनता पार्टीने (भाजप) प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजपचे उमेदवार गणेश बिडकर यांच्यासह चारही उमेदवारांनी मंगळवार पेठ परिसरात दारोदारी जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत प्रचाराचा झंझावात उडवला. दाट लोकवस्तीच्या या भागात भाजपच्या प्रचाराला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
माध्यमांशी बोलताना गणेश बिडकर म्हणाले की, “प्रभाग क्रमांक २४ मध्ये निवडणुकीबाबत उत्साहाचे वातावरण आहे. मंगळवार पेठ हा कष्टकरी नागरिकांचा परिसर असून कोविड काळात तसेच प्रशासकराजच्या काळात भाजप कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी काम केले. त्यामुळेच आज या भागात भाजपसाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.”
ते पुढे म्हणाले, “भाजप नेहमीच विकासाचा मुद्दा घेऊन जनतेसमोर जातो. विरोधक असले तरी आम्ही हात जोडून जनतेशी संवाद साधतो आणि यालाच नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.”
या प्रचारादरम्यान मंगळवार पेठेतील आंबेडकर वस्तीमधील अनेक तरुणांनी भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृत प्रवेश केला. तरुणांच्या या सहभागामुळे भाजपची ताकद अधिक वाढली असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बिडकर यांनी नागरिकांच्या अपेक्षांची जबाबदारी स्वीकारत, निवडून आल्यानंतर विकासकामे आणि जनसेवेच्या माध्यमातून न्याय देण्याचे आश्वासन दिले. कसबा गणपती, कमला नेहरू हॉस्पिटल परिसराचा समावेश असलेला प्रभाग क्रमांक २४ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. चारही उमेदवारांच्या संयुक्त प्रचारामुळे या प्रभागात भाजपची पकड आणखी मजबूत होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.