प्रभाग क्रमांक ११ मधील भाजप पदयात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद; चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रचाराने कोथरुड दणाणला

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक ११ मधील पदयात्रेला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. ताशांच्या गजरात, ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी आणि भाजपच्या विजयाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी गाडीच्या टपावर उभे राहून नागरिकांना संबोधित करत पदयात्रेत सहभाग नोंदवला.

प्रभाग क्रमांक ११ मधील भाजपचे उमेदवार अजय मारणे, अभिजीत राऊत, मनीषा बुटाला आणि शर्मिला शिंदे यांच्या प्रचारार्थ कोथरुड परिसरात ही भव्य पदयात्रा काढण्यात आली. पौड फाटा येथील दुर्गामाता मंदिरापासून पदयात्रेचा प्रारंभ झाला. दुर्गामाता मंदिर, केळेवाडी, हनुमान नगर, मोरे विद्यालय, रामबाग कॉलनी, शिवतीर्थ नगर, जयभवानी नगर, म्हातोबादरा आणि सुतारदरा या मार्गावरून पदयात्रा मार्गस्थ झाली. या पदयात्रेत महिलांचा व तरुणांचा सहभाग लक्षणीय होता.

यावेळी बोलताना ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, “कोथरुडकरांनी दोन वेळा मला निवडून दिले असून, गेल्या सहा वर्षांत नागरिकांच्या गरजा ओळखून विविध विकासकामे व लोकोपयोगी उपक्रम राबवले. मानसी, सुखदा यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील मुलींसाठी काम करण्याची संधी मिळाली. विरोधकांनी हे उपक्रम निवडणूकपुरते असल्याचा अपप्रचार केला; मात्र विधानसभा निवडणुकीनंतरही हे उपक्रम सुरूच असून, भविष्यातही ते सुरू राहतील.”

पदयात्रेनंतर झालेल्या सांगता सभेलाही नागरिकांची मोठी गर्दी होती. हा उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजेच विजयी सभेची नांदी असल्याचे सांगत, आगामी महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ११ मधील भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच कोणत्याही प्रकारच्या दमदाटीला नागरिकांनी बळी पडू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पदयात्रेदरम्यान ठिकठिकाणी महिलांनी ना. चंद्रकांतदादा पाटील आणि भाजप उमेदवारांचे औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. या पदयात्रेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, विरोधकांमध्ये धडकी भरल्याची चर्चा प्रभागात रंगली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button