अभिनेता अशोक शिंदे बनले मनोवैज्ञानिक; ‘केस नं. ७३’मधून मराठी रुपेरी पडद्यावर पुनरागमन

पुणे दि. 11 : रंगमंच, मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमांत आपल्या अष्टपैलू अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक शिंदे आता एका वेगळ्याच भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहेत. आगामी मराठी चित्रपट ‘केस नं. ७३’ मध्ये ते मनोवैज्ञानिक डॉ. श्रीकांत ही महत्त्वाची आणि गूढ व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने अशोक शिंदे बऱ्याच काळानंतर मराठी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहेत.

‘केस नं. ७३’चा नुकताच प्रदर्शित झालेला गूढ टिझर प्रेक्षकांच्या उत्सुकतेत भर घालणारा ठरला आहे. भय, वास्तव आणि भ्रम यांच्या सीमारेषांवर उभं राहणारं हे कथानक नेमकं कोणत्या रहस्याकडे घेऊन जाणार आहे, याबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. डॉ. श्रीकांत हे रहस्य उलगडू शकतील की तेच या रहस्याचा एक भाग असतील, हे चित्रपट पाहताना उलगडणार आहे.

या भूमिकेबद्दल बोलताना अशोक शिंदे म्हणतात, “प्रसिद्ध मनोवैज्ञानिक डॉ. श्रीकांत ही व्यक्तिरेखा माझ्यासाठी आव्हानात्मक होतीच, पण अभिनेता म्हणून ती साकारताना खूप आनंद मिळाला. प्रेक्षकांनाही ही भूमिका नक्की आवडेल, असा विश्वास आहे.”
लायलॅक मोशन पिक्चर्स आणि डस्क स्टुडिओज निर्मित ‘केस नं. ७३’ हा मराठी चित्रपट नव्या वर्षात जानेवारीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांनी केले असून निर्मिती शर्वरी सतीश वटक आणि डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांची आहे. सहनिर्माते प्रविण अरुण खंगार आहेत.

चित्रपटात अशोक शिंदे, राजसी भावे, शैलेश दातार, नंदिता पाटकर, पियुष आपटे अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. पटकथा डॉ. ऋचा अमित येनुरकर यांची असून गीतलेखन मंदार चोळकर, तर संगीत व पार्श्वसंगीत अमेय मोहन कडू यांनी दिले आहे. छायांकनाची जबाबदारी निनाद गोसावी यांनी सांभाळली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button