
पुणे, दि. 10 : गेल्या आठ वर्षांपासून पुणे महापालिका भाजपाच्या ताब्यात असून लोहियानगरमधील एसआरए प्रकल्प पूर्णतः अपयशी ठरला आहे. या प्रकल्पामुळे विकास होण्याऐवजी नागरिकांची फसवणूक झाली असून अस्वच्छता, मूलभूत सुविधांचा अभाव आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे रहिवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे, अशी टीका माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांनी केली.
पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रभाग क्रमांक २२ मध्ये अखिल भारतीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व मित्रपक्षांच्या अधिकृत उमेदवारांच्या पदयात्रेच्या समारोप सभेत ते बोलत होते. यावेळी उमेदवार इंदिरा अविनाश बागवे, अविनाश बागवे, रफीक शेख आणि दिलशाद शेख उपस्थित होते.
बागवे पुढे म्हणाले की, लोहियानगर हा पूर्णतः झोपडपट्टीचा भाग असून येथील नागरिकांना रोज विविध समस्यांना सामोरे जावे लागते. हा भकासपणा दूर करायचा असेल तर येत्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करणे आवश्यक आहे.
लोहियानगरमध्ये सर्व जाती-धर्मातील नागरिक एकत्र राहत असल्याने येथे सर्वधर्मसमभावाच्या भावनेतून विकासकामे करावी लागतील. त्यासाठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना संधी देण्याचे आवाहन माजी नगरसेवक व उमेदवार अविनाश बागवे यांनी केले.
दरम्यान, संपूर्ण लोहियानगर वसाहतीत काढण्यात आलेल्या पदयात्रेत उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. या पदयात्रेला नागरिक व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले.
या पदयात्रेत माजी मंत्री रमेश बागवे, जुबेरबाबू शेख, यासेर बागवे, चंद्रकांत चव्हाण, कविराज संघेलिया, मुन्नाभाई शेख, रोपभाई शेख, आरीफ शेख, विठ्ठल थोरात, दयानंद अडागळे, शफीक शेख, मारुती कसबे, राजू बरगुडे यांच्यासह काँग्रेस व मित्रपक्षांचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते