भाजप आज राज्यातील सर्वात दुबळा पक्ष; निवडणुकांमध्ये गैरप्रकारांचा कळस – हर्षवर्धन सपकाळ

पुणे, दि. १० : राज्यातील निवडणूक प्रक्रिया पारदर्शक राहिलेली नसून भारतीय जनता पक्ष आज राज्यातील सर्वात दुबळा पक्ष बनला आहे. त्यामुळेच भाजपला निवडणुकांमध्ये गैरप्रकार, भ्रष्टाचार आणि दुसऱ्या पक्षातील उमेदवार आयात करावी लागत असल्याची जोरदार टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली.

राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकांदरम्यान मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर घोळ असल्याचे निवडणूक आयोगानेही मान्य केले होते. दुबार नावे असलेल्या मतदारांचे मतदान एकाच ठिकाणी होईल, असे जाहीर करूनही प्रत्यक्षात तसे झाले नाही. येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्येही मतदार यादीतील गोंधळ कायम असून सत्ताधाऱ्यांवर निवडणूक आयोगाचा कोणताही धाक उरलेला नाही, असा आरोप सपकाळ यांनी केला. प्रभाग रचना करताना प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून गैरप्रकार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार रोज भाजपवर टीका करतात, मात्र तरीही सत्तेत भाजपसोबत चिकटून राहतात. ‘गोचीडासारखे वागणे त्यांना शोभत नाही’, असा टोला लगावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप होत असतानाही अजित पवार यांचा राजीनामा का घेतला जात नाही, असा सवाल सपकाळ यांनी उपस्थित केला. यावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ‘नूरा कुस्ती’ सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरण आणि जैन बोर्डिंग जमीन प्रकरणांमध्ये अप्रत्यक्ष भ्रष्टाचार झाला असून त्याचे समर्थन अजित पवार करत असल्याचे सपकाळ म्हणाले. पुणे हे विद्येचे व सांस्कृतिक शहर असताना आज ते ड्रग्स आणि कोयत्यांसाठी ओळखले जाऊ लागले आहे. सत्तेचे सौदागर शहर विकण्याचे काम करत असून, पुण्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीबाबत बोलताना सपकाळ म्हणाले की, अजित पवार यांच्या पक्षासोबत कोणत्याही परिस्थितीत न जाण्याची ठाम भूमिका असल्यामुळे आघाडी शक्य झाली नाही. मात्र शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्याशी युती असून संयुक्त प्रचार सुरू आहे.

राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी केली नाही, ‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे वाढवले नाहीत, केंद्र सरकारने दिलेले दोन कोटी रोजगारांचे आश्वासनही फसवे ठरले आहे. पुण्यात मोफत मेट्रो व बससेवेची घोषणाही केवळ हवेतली असल्याची टीका त्यांनी केली.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना उमेदवारी दिली जात असल्याने राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. जाती-धर्मातील तेढ आणि गुंडगिरीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असून त्यांची नार्को चाचणी करावी, अशी मागणीही सपकाळ यांनी केली.

यावेळी काँग्रेस प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी आमदार दीप्ती चौधरी, ॲड. अभय छाजेड, प्रवक्ते गोपाळ तिवारी, शहर उपाध्यक्ष अजित दरेकर, सरचिटणीस प्राची दुधाने, नीता राजपूत आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button