
पुणे दि 10 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी (RSS) हे वर्ष अत्यंत ऐतिहासिक ठरणार आहे. देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या संघटनेला यंदा शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या शतकपूर्तीच्या निमित्ताने संघाच्या वाटचालीचा गोंगाटापलीकडील, वास्तव आणि प्रामाणिक आढावा घेणारा हिंदी चित्रपट ‘शतक (संघ के १०० वर्ष)’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
शंभर वर्षांच्या या प्रवासात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतातील सर्वाधिक चर्चेत असलेली संघटना राहिली आहे. मात्र संघाविषयीची सार्वजनिक मते अनेकदा धारणांवर आधारित राहिली. संघाचे मूळ तत्त्वज्ञान, मूल्यव्यवस्था आणि अंतर्गत कार्यपद्धती यांचा सखोल अभ्यास फारसा झाला नाही. ‘शतक’ हा चित्रपट याच पार्श्वभूमीवर संघाच्या खऱ्या इतिहासाकडे पाहण्याचा प्रयत्न करतो.
वीर कपूर निर्मित आणि आशिष तिवारी सहनिर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन आशिष मल यांनी केले आहे. एडीए ३६० डिग्री एलएलपी यांच्या सहकार्याने साकारलेल्या या चित्रपटात संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे विचार, त्यांचे योगदान तसेच एम. एस. गोळवलकर (गुरुजी) यांच्या नेतृत्वाखाली झालेला संघटनात्मक विस्तार उलगडण्यात आला आहे. मूल्यनिष्ठा, शिस्त आणि दीर्घकालीन दृष्टीकोन या तत्त्वांवर उभ्या राहिलेल्या संघाचे वास्तव स्वरूप सिनेमॅटिक मांडणीतून प्रेक्षकांसमोर आणले जाणार आहे.
चित्रपटाबाबत निर्माता वीर कपूर म्हणतात, “‘शतक’ हा शांत, पण अथक परिश्रमांनी उभ्या राहिलेल्या प्रवासातील एक नम्र प्रयत्न आहे. गैरसमज आणि धारणांपलीकडे जाऊन संघाची भूमिका स्पष्टपणे मांडणे, तसेच राष्ट्रीय अभिमान, एकता आणि स्पष्टता या मूल्यांना अधोरेखित करणे हेच आमचे ध्येय आहे.”
‘शतक’ हा चित्रपट याच वर्षी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून, संघाच्या शंभर वर्षांच्या प्रवासाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची संधी तो प्रेक्षकांना देणार आहे.