
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २४ चे भाजप उमेदवार गणेश बिडकर यांनी सोमवार पेठेतील शाहू उद्यान येथे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिक, महिला मतदार तसेच स्थानिक खेळाडूंशी थेट संवाद साधला. या जनसंपर्क मोहिमेदरम्यान त्यांनी प्रभागातील विविध समस्या जाणून घेतल्या आणि भविष्यातील विकासाचा स्पष्ट रोडमॅप मांडला.
मॉर्निंग वॉकदरम्यान बिडकर यांनी ज्येष्ठ नागरिकांशी सविस्तर चर्चा करत त्यांच्या सुरक्षिततेसह आवश्यक सोयी-सुविधा वाढवण्यावर भर दिला. ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाने महापालिकेच्या माध्यमातून ठोस उपाययोजना राबवण्याचे आश्वासन दिल्याने उपस्थितांमध्ये समाधान व्यक्त झाले.
यावेळी उपस्थित महिला मतदारांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर महिलांसाठी आणखी महिला-केंद्रित योजना राबवण्याचा निर्धार गणेश बिडकर यांनी व्यक्त केला. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पुढील काळात विशेष प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.
शाहू उद्यानात बॅडमिंटनचा सराव करणाऱ्या खेळाडूंशी संवाद साधताना बिडकर यांनी काही वेळ खेळातही सहभाग घेतला. प्रभागात खेळाडूंकरिता आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणे, स्थानिक स्पर्धांचे आयोजन करणे आणि भविष्यात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडवण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या सकाळच्या जनसंपर्क दौर्यात स्थानिक कार्यकर्ते आणि इतर उमेदवार उपस्थित होते. गणेश बिडकर यांच्या सक्रिय सहभागामुळे प्रभाग २४ मध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून मतदारांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.