पुणेकरांसाठी ‘फ्री ट्रॅव्हल’चा गेमचेंजर डाव! राष्ट्रवादीचा संयुक्त जाहीरनामा; मेट्रो व PMPML बस प्रवास पूर्णपणे मोफत

पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (दोन्ही गट) संयुक्त जाहीरनाम्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सर्व नागरिकांसाठी मेट्रो आणि PMPML बस प्रवास पूर्णपणे मोफत करण्याचे महत्त्वाकांक्षी आश्वासन राष्ट्रवादीने दिले आहे. ही घोषणा आगामी महापालिका निवडणुकीतील ‘गेमचेंजर’ ठरू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले की, मोफत सार्वजनिक वाहतूक सुविधेमुळे खासगी वाहनांचा वापर कमी होईल. परिणामी, पुण्यातील वाहतूक कोंडी आणि वायुप्रदूषण कमी होण्यास मदत होईल. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांचा एकत्रित अर्थसंकल्प पाहता, या योजनेसाठी वर्षाला सुमारे ३०० कोटी रुपयांचा खर्च प्रशासनासाठी फारसा अडथळा ठरणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, इतर पक्षांनीही वेगवेगळी आश्वासने दिली आहेत. काँग्रेस-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युतीने फक्त महिला प्रवाशांसाठी मोफत बस प्रवास, तर भाजपने ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास आणि महिलांना तिकिटात सवलत देण्याचे आश्वासन जाहीर केले आहे.

वाहतुकीव्यतिरिक्त, राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफी आणि विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट देण्याचाही समावेश आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला आकर्षित करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जात असल्याचे चित्र आहे.

पुणे महानगरपालिकेच्या १६५ जागांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान, तर १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मोफत प्रवासाची घोषणा मतदारांच्या निर्णयावर किती प्रभाव टाकते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button