
पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुका संयुक्तपणे लढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आले आहेत. या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संयुक्त निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.
शहर विकास, पायाभूत सुविधा, सार्वजनिक वाहतूक, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण या मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवत हा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील नागरिकांच्या मूलभूत गरजा, युवकांसाठी रोजगाराच्या संधी, महिलांसाठी सुरक्षितता आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा यांचा समावेश जाहीरनाम्यात करण्यात आला आहे.
या वेळी बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, “शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे आवश्यक होते. मतभेद बाजूला ठेवून जनतेच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.”
तर सुप्रिया सुळे यांनी, “महापालिकांच्या माध्यमातून पारदर्शक, संवेदनशील आणि विकासाभिमुख प्रशासन देण्याचा आमचा संकल्प आहे,” असे स्पष्ट केले.
दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्र येण्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होणार असून, आगामी महापालिका निवडणुका अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.