
पुणे : राज्यातील विविध भागांत थंडीचा कडाका वाढत असून शुक्रवारी किमान तापमानात लक्षणीय घट नोंदवली गेली. पुण्यात किमान तापमान ८.४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले. थंडीमुळे सकाळच्या वेळेत नागरिकांनी जॅकेट, स्वेटरचा आधार घेतलेला दिसून आला.
राज्यातील इतर शहरांमध्येही थंडीचा प्रभाव जाणवला. नगरमध्ये सर्वात कमी म्हणजे ७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नाशिकमध्ये ९.१, साताऱ्यात १० अंश, नांदेडमध्ये ९.८ तर छत्रपती संभाजीनगरमध्ये १०.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.
हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पुढील काही दिवस राज्यात थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. विशेषतः पहाटे आणि रात्रीच्या वेळी थंडी अधिक तीव्र जाणवणार असून नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.