
पुणे : छोट्या व प्रादेशिक पक्षांना फोडून त्यांना कमकुवत करण्याचे काम भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने सुरू आहे. काँग्रेसमध्ये आता लढण्याची ताकद उरलेली नाही. विरोधकांना संपवून एकपक्षीय राजवट आणण्याचा भाजपाचा डाव मतदारांनी उधळून लावावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. हुकूमशाही पद्धतीने वागणाऱ्या भाजपशी दोन हात करण्याची धमक केवळ वंचित बहुजन आघाडीकडेच आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या प्रभाग क्रमांक ६ आणि १३ मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ येरवडा येथील लक्ष्मीनगर परिसरात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी आघाडीचे सरचिटणीस प्रियदर्शन तेलंग, शहराध्यक्ष अरविंद तायडे, माजी आमदार ॲड. जयदेव गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रभाग क्रमांक १३ मधील उमेदवार डॉ. निकिता गायकवाड, रामिजा रज्जाक नरसणगी, स्वाती सुरेश धनगर, ॲड. गजानन श्रीराम चौधरी तसेच प्रभाग क्रमांक ६ मधील शैलेश ऊर्फ पाला मोरे आणि सलमा सादिक शेख हे व्यासपीठावर उपस्थित होते. सभेचे संयोजन राजू ओव्हाळ यांनी केले, तर सूत्रसंचालन प्राण आवाड यांनी केले.ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान आज धोक्यात आले आहे. संविधानात बदल करण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. जोपर्यंत जनता जागरूक आहे, तोपर्यंत संविधानाला हात लावण्याची हिंमत कुणाचीही होणार नाही. भाजपला पराभूत करायचे असेल तर शंभर टक्के मतदान गरजेचे आहे. शोषित, पीडित, वंचित आणि मागास घटकांच्या न्यायासाठी लढणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून देणे हीच आपली जबाबदारी आहे.”लोकांची घरे पाडणे, पक्ष फोडणे आणि भ्रष्टाचारी लोकांना पक्षात घेऊन राजकारणाची वाट लावणाऱ्या भाजपला आता घरी बसवण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.यावेळी माजी आमदार ॲड. जयदेव गायकवाड म्हणाले, “पुणे शहरात फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचे लोक मोठ्या संख्येने एकवटताना दिसत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेनेने शहराचे वाटोळे केले आहे. महार वतनाच्या जमिनीबाबत झालेले प्रयत्न आणि पक्ष फोडीच्या राजकारणामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र रोष आहे. गुंडांना पाठीशी घालणाऱ्या भाजप आणि राष्ट्रवादीला पराभूत करण्याचा निर्धार जनतेने केला आहे.”